नगरमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम थंडावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । पाथर्डी 

२४ डिसेंबर   मोठ्या जोशात सुरु  झालेली अतिक्रमन  विरोधी मोहीम आज पूर्णपणे थंडावून आज एकही अतिक्रमन काढण्यात आले नाही. उद्या असलेली नाताळची सुटी व परवा बुधवारी असलेला  आठवडे बाजार या मुळे ही मोहीम पुन्हा दोन दिवसा  नंतर सुरु राहणार कि बंद पडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की शहरातील अतिक्रमणाच्या मुद्यावरून झालेल्या आंदोलन व प्रतिआंदोलनामुळे महसूल, पालिका,पोलीस व बांधकाम विभागाने शेकडो  पोलिसांचा ताफा तैनात करत गुरवारी  अतिक्रमणविरोधी मोहीम सुरु केली मात्र ही मोहीम सुरु करण्यापूर्वीच अनेकांनी आपली अतिक्रमणे काढून घेतल्याने मोठी कारवाई करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. मात्र तहसील कार्यालया लगत असलेली अतिक्रमणे मात्र जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. गेल्या दोन दिवसामधे  जुन्या बसस्थानका लगत असलेल्या अतिक्रमणधारकांनी सुद्धा आपली अतिक्रमणे स्वतःहून हटवल्याने अनेक रस्ते व चौकांचा श्वास मोकळा झाला असला तरीही शेवगाव रोड लगत असलेली अतिक्रमणे कधी हटणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या मार्गालगत असलेल्या अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने मोठा तिढा निर्माण झाला असून या मार्गालगत असलेली अतिक्रमणे हटवावीत अन्यथा येत्या बुधवारी आत्मदहन करण्याचा इशारा शहरातील व्यावसायिक आंनदकुमार चोरडिया यांनी दिला आहे.

तर पालिका हद्दीतील रहिवासी असलेले दादासाहेब सुपेकर, रवींद्र पाथरकर, शुभम जिरेसाळ, संतोष चन्ने आदींनी तहसीलदारांना एक निवेदन दिले असून त्या मधे म्हटले आहि कि जुन्या साकेगाव रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हि न्यायप्रविष्ठ नाहीत. या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाच्या  संदर्भात महसूल मंत्रालयाने या ठिकाणी असलेल्या प्लॉटची भूमी अभिलेख कार्यालयात जी नोंद आहे ती जैसे थे ठेवा असे आदेश दिले असून या आदेशाच्या विरोधात  औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या नंतर खंडपीठाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयात बेकायदेशीर नोंद न लावण्या संदर्भातील असल्याने या ठिकाणी असलेली बेकायदेशीर बांधकामे त्वरित काढून घेण्याची मागणी केली आहे. या वादग्रस्त विषयावर कागदपत्रांची  छाननी करण्याचे काम महसूल प्रशासनाने सध्या चालवले असून या नंतर हि मोहीम चालू राहणार कि बंद पडणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते किसन चव्हाण यांनी  येत्या काही दिवसात पालिकेच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

अतिक्रमणाच्या विरोधातील मोहीम बंद करण्यात आली नसून आज पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने काही कारवाई करता आलेली नाही. शेवगाव रोड लगत असलेल्या अतिक्रमांच्या संदर्भात कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम चालू आहे. त्या नंतर हि मोहीम पुन्हा सुरु केली जाईल. – नामदेव पाटील तहसीलदार