
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंगळवारी 25 रोजी चिरनेरच्या महागणपती मंदिरांत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चिरनेरचा महागणपती नवसाला पावणारा असल्याची ख्याती असल्याने दर संकष्टी चतुर्थीला या मंदिरात महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी दूर-दूर गावाहून भक्त गण येत असतात. वेगवेगळ्या गावातून अनेक दिंड्या महागणपतीच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची लांब लचक रांग लागली होती. अंगारकी निमित्त चिरनेर गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. विविध प्रकारची खाऊची, फुलांची तसेच खेळण्यांच्या दुकानांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता. नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील अनेक भक्तांनी यावेळी गणपतीचे दर्शन घेतले. महागणपतीच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांची काळजी महागणपती देवस्थान ट्रस्ट तर्फे घेतली जात होती. दिवसभरात हजारो भाविकांनी महागणपतीचे दर्शन घेतले.

































































