मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारचा शपथविधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारचा शपथविधी पार पडला. 28 आमदारांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यात एका अपक्षासह दोन महिलांचा समावेश असून एका मुस्लीम आमदाराला मंत्री पद देण्यात आले आहे. काँग्रेस सरकारला पाठिंबा देऊन बहुमतात येण्यास मदत करणाऱया समाजवादी पार्टी आणि बसपाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.

सरकारमध्ये मंत्री पदे देताना कमलनाथ, दिग्विजय सिंग आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा सर्वच गटांतील आमदारांचा विचार केला गेला आहे. कमलानाथ यांचे 10, दिग्विजय यांचे 7 तर शिंदे यांच्या 6 समर्थक आमदार मंत्री झाले. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आज सर्वांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिग्विजय सिंह यांचे 32 वर्षीय पुत्र जयवर्धन सिंह हे सर्वात तरुण मंत्री आहेत. काँग्रेसच्या पहिल्यांदाच आमदार झालेल्या 55 पैकी एकालाही मंत्री पद देण्यात आलेले नाही.

छत्तीसगडमध्ये 9 मंत्र्यांचा शपथविधी
छत्तीसगडमध्येही आज 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळात आता 12 मंत्री झाले आहेत. बघेल यांच्यासह सर्व मंत्री हे कोटय़धीश आहेत. सर्वात तरुण मंत्री असलेले उमेश पटेल यांची मालमत्ता 1.78 कोटी रुपये आहे, तर सर्वाधिक श्रीमंत मंत्री असलेले टी.एस. सिंहदेव यांची मालमत्ता 500 कोटी रुपये आहे.

कमलनाथ सर्वात श्रीमंत
मध्य प्रदेशच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुख्यमंत्री कमलनाथ आहेत. त्यांची मालमत्ता 206.9 कोटी रुपये आहे तर आज शपथ घेतलेल्या 28 मंत्र्यांची एकूण मालमत्ता 220 कोटी रुपये आहे. 72 वर्षीय कमलनाथ हे मंत्रिमंडळात सर्वाधिक वयाचे आहेत. त्यांच्यासह 9 मंत्री हे वयाची साठी ओलांडलेले आहेत.