
सामना प्रतिनिधी, नांदगांव
शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी करावी, तालुक्यात चारा छावण्या सुरू कराव्यात व मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, गरजूंना रेशनकार्ड त्वरित द्यावे या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस देविदास भोपळे, विजय दराडे, प्रकाश कापसे, रतन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
येथील रहदारी बंगला येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी वनजमिनीचे सातबारा दावेधारकांच्या नावे करण्यात यावे, वनजमीनधारकांच्या ताब्यातील क्षेत्राची स्थळ पाहणी करण्यात यावी व तसा दाखला दावेधारकांना देण्यात यावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, तालुक्यात चारा छावण्या सुरू करा व मजुरांना काम द्या, कांदा या पिकास प्रतिक्विंटल 1 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, गरजूंना रेशनकार्ड त्वरित देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार भारती सागरे यांना देण्यात आले.
या वेळी संजय सोनवणे, कोंडिराम माळी, जयराम बोरसे, भिकन देवरे, जिभाऊ वाघ, फकिर पवार, गोरख वाघ, गोरख निकम, कैलास जाधव, मंगलू सराईत, लहू माळी, शंकर गंभीरे आदींसह तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व वनजमीनधारक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.



























































