
>>राजन वसंत देसाई<<
खरं म्हणजे मोबाईल क्रांती ही इलेक्ट्रॉनिक माध्यम, मीडिया, प्रसारमाध्यम वगैरे साधनांशी कितीही संबंधित असली तरी माणसामाणसामधील अंतर कमी झाले आणि संवाद संपला. वाद-विवाद, क्रिया-प्रतिक्रिया यातून सुसंवाद तर अखेरची घटका मोजतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडिया हा जरी क्रांतिकारक शोध असला तरी त्याचा समाजमनावर होणारा परिणाम अथवा दुष्परिणाम यांचा कमी विचार केला गेला.
प्रगतीचा वेग आणि समाजमन यांचे जरी अतुट नाते असले तरी काही गोष्टींमधला वेग हा समाजाला अंतर्मुख करायला लावतो आणि म्हणूनच प्रगतीमधली ‘गती’ ही अतिशय सावधरीत्या समाजात पसरायला हवी. अगदी ताजे उदाहरणच घ्यायचे झाले तर मोबाईल क्रांतीचे घ्यावे लागेल. पूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा टेलिफोन होते आणि तोपर्यंत संवाद असायचा. एखाद्या बातमीची शहानिशा करूनच ती बातमी व्हायची. म्हणजेच घटना ते बातमी यामध्ये संवाद असायचा. त्या घटनेवर लगेच प्रतिक्रिया उमटू शकत नसे. त्यामुळे एखाद्या घटनेचे गांभीर्य हे त्याचवेळी संवादातून व्यक्त होत असे. काही वेळा तर एखाद्या अप्रिय घटनेवर संवाद, सुसंवाद, वादविवाद या प्रक्रियेनंतर ती बातमी ज्या स्वरूपात बातमीची अथवा घटनेची मोठय़ा छोटय़ा विभागात विभागणी होत असे. मग समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांची वेळीच दखल घेऊन त्यावर सावध प्रतिक्रिया नोंदवली जात असे. मग संवाद टेलिफोन, टेलिग्राफ आणि वर्तमानपत्र असा साधारण क्रम असायचा. त्यामुळे घटनेवरील पडसाद हे समाजाला सावध करायचे. त्यामुळे काही अप्रिय घटनांचा मागोवा घेण्यास प्रशासन व पोलीस यंत्रणा तसेच आपत्कालीन यंत्रणेला परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेळ मिळायचा. मात्र यात सुधारणा होत गेली आणि अचानकच मोबाईलची क्रांतिमय एन्ट्री झाली. याला Entry हाच शब्द चपखल आहे. कारण ‘आगमन’ हा शब्द उच्चारीपर्यंत एखादी बातमी जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या टोकाला पापणीचे पाते लवते न लवते तोच जाऊन धडकते. हा वेग प्रकाशाच्या, वायुवेगाच्याही प्रचंड प्रमाणात पसरला. त्यामुळे एखाद्या बातमीतील सत्य, असत्यता पडताळण्याअगोदरच त्याचे पडसाद समाजमनावर उमटू लागले. यालाच पोस्ट. ‘व्हायरल होणे’ हा शब्द प्रचलित झाला. खरं म्हणजे मोबाईल क्रांती ही इलेक्ट्रॉनिक माध्यम, मीडिया, प्रसारमाध्यम वगैरे साधनांशी कितीही संबंधित असली तरी माणसामाणसामधील अंतर कमी झाले आणि संवाद संपला. वाद-विवाद, क्रिया-प्रतिक्रिया यातून सुसंवाद तर अखेरची घटका मोजतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच मानवी मन अधिकच उद्विग्न होऊन काहीसं शीघ्रकोपी होऊ लागले.
सोशल मीडिया हा जरी क्रांतिकारक शोध असला तरी त्याचा समाजमनावर होणारा परिणाम अथवा दुष्परिणाम यांचा कमी विचार केला गेला. आपल्या देशाचाच विचार केला तर असे दिसून येईल की, संपूर्ण देशाच्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक जास्त लोकांजवळ मोबाईल आहे. त्यात भरीस भर म्हणजे मोबाईलचा इतक्या प्रमाणाबाहेर खप वाढला की, अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांचे किमतीपेक्षा अर्ध्याहून कमी किमतीत मोबाईल मिळू लागले आणि मोबाईल घराघरात, अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला. हा शोध किंवा विज्ञानाची प्रगती खरोखरच थक्क करणारी आहे. मोबाईल न वापरणारे मिळणे दुरापास्त झाले आहे. मोबाईल आता चैनीची वस्तू राहिली नसून गरज, किंबहुना जगण्यातील अविभाज्य घटक बनला आहे. हे सर्व आघाडय़ांवर सकारात्मक दृश्य मान्य करताना त्याचे समाजमनावर होणारे दुष्परिणाम हे मागून येणारे किंवा स्लो पॉयझनिंगसारखे शरीरात समाजाच्या जीवनशैलीत आज दिसून येत आहेत. अशावेळी एक म्हण नेहमीच उपयोगात येते ती म्हणजे अग्नीने अन्न शिजवता येते त्याचबरोबर अग्नीने घरे जाळता येतात. समृद्धी, प्रगतीच्या वाटेवरचा प्रवास जर सावध असेल, त्याचा वेग जर मानवाच्या नियंत्रणात असेल तर प्रगतीही सुदृढ किंवा हितकारक ठरते, पण याच वाटेवर जर सुसंस्कृत समाजाला बाधा आणतो किंवा त्याचा गैरवापर होऊ लागतो तेव्हा तेच बूमरँग होऊन आपल्यालाच उद्ध्वस्त करू शकते. म्हणूनच एखादा शोध किंवा साधन हे शस्त्र्ा आणि शास्त्र्ा यात समतोल साधतच समाजात एकरूप झाले पाहिजे. शस्त्र्ा आणि शास्त्र्ााचा सखोल अभ्यास नसेल तर समाजातील ज्या विध्वंसक वृत्ती असतात त्या त्याचा गैरफायदा घेतात आणि म्हणूनच एखाद्या संवेदनशील घटनेचे स्वरूप त्यातील दाहकता लक्षात न घेता जेव्हा सोशल मीडियाद्वारे व्हॉटस् ऍप किंवा फेसबुक व अन्य साधनांद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. तेव्हा ती बातमी व्हायरल होऊन तिची लागण एखाद्या रोगासारखी पसरते. एखाद्या गावात, शहरात, एखाद्या मंदिरात किंवा धर्मस्थानात किंवा एखाद्या महापुरुषाच्या पुतळय़ाला कोणातरी समाजघटक काळे फासतो किंवा एखाद्या गावात बलात्कार किंवा खुनाची घटना घडते तेव्हा त्याला काही वेळा धार्मिक किंवा जातीचे लेबल लावून जाळपोळ, हिंसाचार होतो. त्यात सार्वजनिक मालमत्तेची हानी, नागरिकांच्या जिवाला धोका आणि समाजात तेढ निर्माण होते. ही सारी एका छोटय़ा प्रकरणाने केलेली विकृती आहे. म्हणूनच शोध ही आजची गरज असते, पण उद्याची विकृती बनते. हे सारे आपल्या देशात जास्त प्रमाणात घडते. मोबाईल, त्याचा वापर हा इतर देशांनीसुद्धा उपयोगात आणला. पण बातमी व्हायरल होताना नागरिकांनी मनाचे कुठेही संतुलन न बिघडवता परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे कार्य केले. म्हणूनच अगदी वर्ल्ड ट्रेडवरचा हल्ला आणि आपल्या मुंबईवर झालेला हल्ला यातील मीडियाने वाहिन्यांनी दाखवलेली कथित तत्परता ही सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होती. म्हणूनच एखादी घटना, तिचे होणारे समाजमनावर दूरगामी परिणाम यांचा विचार केला तर कोणताही मेसेज व्हायरल न होऊ न देणे, किमान त्यातली दाहकता लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. घटनेने दिलेले स्वातंत्र्य हे स्वैराचारी असू नये. कारण सोशल मीडिया, मोबाईल क्रांती यातून निघणारे मेसेज हे व्हायरल होण्यापूर्वी त्यावर समाजाचाच अंकुश असणे गरजेचे आहे. सेन्सॉरशिप जरी कायदाबाहय़ असले तरी किमान समाजावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचा विचार होणे गरजेचे आहे. म्हणूनच मोबाईलचा अति वापर, खासकरून तरुणांमध्ये वाढला आहे. फक्त पोस्ट व्हायरल होण्यापेक्षा त्यावर संवाद व सुसंवाद घडवून आणणे ही काळाची गरज आहे




























































