
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेले कलागूण शोधून या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा व्यापारी पैसा फंड संस्थेच्या या शाळेचा उपक्रम अभिनंदनीय आहे. विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून आपले मन भारावून गेले. या उपक्रमातून घडणारे कलाकार शाळेचे नांव विविध स्तरावर उज्वल करतील असा विश्वास ठाणे येथील तहसीलदार आणि चित्रकार रमाकांत संसारे यांची कन्या आसावरी संसारे यांनी व्यक्त केला . रमाकांत संसारे हे चित्रकार तर होतेच पण ते माणूस म्हणून जगले आणि त्यांनी अविरत कष्टाचा आणि कलेतील सरावाचा संदेश आपल्या जीवन शैलीतून दिला असेही त्यांनी नमूद केले.
संगमेश्वर येथील चित्रकार कै. रमाकांत संसारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात तहसीलदार संसारे या बोलत होत्या . यावेळी व्यासपीठावर श्रीमती संगीता संसारे, उदय संसारे, रुपाली नलावडे, मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक नेहा संसारे, उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी चित्रकार रमाकांत संसारे यांच्या कलाविषयक जीवन प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी विविध ठिकाणी फीरुन पाच हजारांपेक्षा अधिक पेंसिल रेखाटनं केली, कलेला वाहून घेतलेले रमाकांत संसारे हे एक प्रयोगशिल चित्रकार असल्याचे बाळासाहेब चव्हाण यांनी नमूद केलं.
सदर चित्रकला स्पर्धा पाचवी ते बारावी अशी तीन गटात संपन्न झाली . या स्पर्धे मध्ये प्रशालेतील ३१३ विद्यार्थी सहभागी झाले होते . पहिल्या गटात प्रथम – आयुष अनिल सावंत, द्वितीय – नाजिश समीर ताडे , तृतीय – समृद्धी संतोष जाधव, उत्तेजनार्थ- युवराज दीपक जाधव, आठवी ते दहावी या गटात प्रथम – आर्य राजेश बोरसुतकर, द्वितीय – शर्वरी शरद सावंत, तृतीय – किरण सुभाष डावल तर उत्तेजनार्थ – प्रशांत राजाराम डिके, उच्च माध्यमिक गटात प्रथम – वैभव रामचंद्र पडवळ, द्वितीय – अश्विन सुरेश खापरे, तृतीय – सिध्दी लक्ष्मण बंकापूरे उत्तेजनार्थ – विराज संजय सावंत यांनी यश प्राप्त केले. विजेत्यांना रोख पारितोषिक आणि आकर्षक स्मृतिचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. संसारे कुटुंबियांच्या वतीने प्रशालेच्या कलावर्गाला पाण्यासाठी एक हजार लिटरची टाकी भेट देण्यात आली. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.





























































