अरण्यवाचन…मानस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनंत सोनवणे,[email protected]

हिंदुस्थानातील सर्व 22 वन्यजीव हिंदुस्थानातील एका जंगलात अस्तित्वात आहेत. ते जंगल म्हणजे आसामचं मानस राष्ट्रीय उद्यान.

इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्व्हेशन ऑफ नेचर ऍण्ड नॅचरल रिसोर्सेस या संस्थेनं जगात धोक्यात आलेल्या 41 वन्यप्राणी व पक्ष्यांची यादी जेव्हा प्रसिद्ध केली तेव्हा त्यात 22 हिंदुस्थानी वन्यजीवांचा समावेश होता. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व 22 वन्यजीव हिंदुस्थानातल्या एका जंगलात अस्तित्वात आहेत. ते जंगल म्हणजे आसामचं मानस राष्ट्रीय उद्यान. युनेस्कोच्या यादीतलं नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ, व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प आणि जागतिक कीर्तीचं जैवविविधता केंद्र अशी अनेक बिरुदं मिरवणारं एक सर्वांगसुंदर जंगल.

manas-2
आसाममध्ये हिमालयाच्या पायथ्याशी पसरलेलं हे हिरवंकंच जंगल हिंदुस्थान आणि भूतानदरम्यानची सीमारेषा आहे. मानसचा काही भाग भूतानमध्येही येतो. या जंगलातून वाहणाऱया मानस नदीच्या नावावरून राष्ट्रीय उद्यानाचं नामकरण झालंय. 1928 साली सर्वप्रथम या जंगलाला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला. 1973 साली व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली, तर 1990 मध्ये राष्ट्रीय उद्यान जाहीर झालं. चोरटी शिकार आणि बोडो अतिरेक्यांच्या कारवायांमुळे इथल्या वन्यजीवनाची प्रचंड हानी झाली. तरीही इथल्या निसर्गदत्त भौगोलिक दुर्गमतेमुळे इथली जैवविविधता बहरत राहिली.

मानसमधली वनं साल वृक्षांनी व्यापलेली आहेत. शिवाय अंकोल, अर्जुन, मोह, बांबू, पळस, साग, तेंदू, शाल्मली, सिरस, शिशम इत्यादी वृक्ष, अनेक प्रकारची वेली आणि गवत व औषधी वनस्पतींनी ही बनं समृद्ध आहेत. जवळपास 300 प्रजातींची जंगली ऑर्किडस् मानसमध्ये आढळतात.

इथं सस्तन वन्यप्राण्यांच्या 55, पक्ष्यांच्या 400 आणि सरपटणाऱया प्राण्यांच्या 50 प्रजाती पाहायला मिळतात. वन्यप्राण्यांमध्ये अर्थातच वाघ मानसच्या संपन्न जंगलाचा आत्मा आहे. एकेकाळी बेसुमार शिकारीला बळी पडलेला वाघ, व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेपासून इथं पुन्हा सुखानं राज्य करतो, पण वाघापेक्षाही अतिदुर्मिळ असा मार्जार कुळातला एक प्राणी इथं वास करतो. तो म्हणजे ढगाळ बिबटय़ा. आणि हो, इथं काळा बिबटय़ा तर आहेच. शिवाय आशियाई हत्तींचं हे हक्काचं निवासस्थान आहे. शेजारच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातून एकशिंगी गेंडे इथं चरायला येतात. अतिशय आक्रमक अशा जंगली म्हशीही चरताना दिसतात. अतिशय सुंदर आणि दुर्मिळ असं सोनेरी वानर हे मानसचं आणखी एक वैशिष्टय़. शिवाय टोपीवाले वानर आणि लठ्ठ लजवंती वानर तसंच गिबन एप झाडांवर उडय़ा मारताना दिसतात. मानसनं डुकरी हरण, वामनमूर्ती डुक्कर, छोटी रानमांजर, दृढलोभी ससा , बाराशिंगा इत्यादी दुर्मिळ वन्यजीवांचा वारसा जतन करून ठेवलाय. शिवाय रानकुत्रे, चितळ, सांबर, रानडुक्कर, पाणमांजर इत्यादी वन्यजीवही इथं पाहायला मिळतात.
सारंग कुळातल्या बंगाली तनमोर या दुर्मिळ पक्ष्याची सर्वाधिक संख्या मानसमध्ये आढळते. याशिवाय मोठा धनेश, मलबारी धनेश, राखी धनेश, तुरेवाला कालीन पीझन्ट, मराठा सुतार, रानकोंबडा, विविध प्रकारचे गरुड, ससाणे, बुलबुल, मैना, नाचण, मोर, कोतवाल, गप्पीदास, सातभाई, बगळे इत्यादी पक्षी इथं पाहायला मिळतात. मानस नदीच्या जलाशयावर अनेक पाणपक्षी दिसतात. त्या खंडय़ा, मत्स्य गरुड, वंचक, पाणकावळे इत्यादींचा समावेश होतो. हिवाळय़ात स्थलांतरित पक्षी येतात. लडाख, तिबेटहून येणारी चक्रवाक बदकं, सैबेरियातली सररूची बदकं, युरोपातले ऑप्रे, कारंडक, पिवळा धोबी, खरक्रौंच हे पक्षी हिवाळय़ात इथं पाहायला मिळतात.

manas-1

मानस राष्ट्रीय उद्यानात जीपमधून, बोटीमधून तसंच हत्तीवर बसून पर्यटकांना वन्यजीवांचं दर्शन घेता येतं. हे जंगल म्हणजे हिंदुस्थानचा अनमोल ठेवा आहे. आपण हिंदुस्थानींना निसर्गाने दिलेलं वरदान आहे. मात्र बांगलादेशी घुसखोरांचा मोठा धोका मानसला जाणवतोय. हे घुसखोर वनजमिनीवर अतिक्रमण करून झोपडय़ा उभारतात आणि राजकीय वरदहस्त मिळवून इथं कायमचं बस्तान बसवतात. बोडो चळवळीबरोबरच या बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येवरही वेळीच उपाय करायला हवा. नाही तर ही कीड मानसचा नैसर्गिक ठेवा हळूहळू कुरतडत राहील.

मानस राष्ट्रीय उद्यान

जिल्हा…चिरांग व बक्सा
राज्य…आसाम,
क्षेत्रफळ…500 चौ.कि.मी.,
निर्मिती…1990
जवळचे रेल्वे स्थानक…बारपेटा (50 कि.मी.)
जवळचा विमानतळ…गुवाहाटी (170 कि.मी.)
योग्य हंगाम…नोव्हेंबर ते एप्रिल
सुट्टीचा काळ…नाही
साप्ताहिक सुट्टी… नाही
निवास व्यवस्था…वनविभागाचे विश्रामगृह