गडचिरोली जिल्ह्यातील १५ हजार कुणबी बांधवांचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

कुणबी समाजाचा एसईबीसीमध्ये समावेश करुन मराठ्यांच्या १६ टक्के आरक्षणातून आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गुरूवारी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १५ हजार कुणबी समाजबांधवांनी मोर्चा काढून येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

कुणबी समाजाचा एसईबीसीमध्ये समावेश करुन मराठ्यांना दिलेल्या १६ टक्के आरक्षणातून कुणबी समाजाला आरक्षण द्यावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागू कराव्या, नोकरभरतीसंदर्भातील पेसा कायद्यांतर्गत राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेत बदल करुन सर्व प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, कुणबी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची निर्मिती करुन त्यांना सर्व अभ्यासक्रमांसाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये हमीभाव द्यावा, वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी, कुणबी जातीला अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अन्वये संरक्षण देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. काँग्रेसचे आमदार सुनील केदार व भाजप नेते तथा विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी उपस्थितांना संबोधित केले. काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार हेही यावेळी उपस्थित होते. सभेचे संचालन अजय लोंढे व प्रास्ताविक प्रशांत वाघरे यांनी केले. त्यानंतर काँग्रेसच्या मजूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले हे मोर्चात सहभागी झाले. पटोले हे मोर्चेकऱ्यांसोबत पायी चालत गेले. प्रमुख मार्गाने मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच केली. तेथे मोर्चाचे पुन्हा सभेत रुपांतर झाले.