
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘ट्राय’च्या आडून केबल ग्राहकांवर दरवाढ लादणाऱया, त्याचप्रमाणे दहा लाखांहून अधिक केबलचालकांच्या कमिशनवर डल्ला मारून त्यांचा रोजगार धोक्यात आणणाऱया ‘स्टार’ कंपनीविरोधात केबलचालकांनी जोरदार आंदोलन केले. शिवसेना आमदार अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली जांभोरी मैदान ते लोअर परळ असा मोर्चा काढून ‘स्टार’ कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. केबलचालक, एमएसओचा 40 टक्के हिस्सा कायम ठेवून ग्राहकांना परवडणाऱया दरात केबल देण्याचा निर्णय येत्या 15 दिवसांत घ्या अन्यथा आंदोलन तीक्र केले जाईल असा इशाराच स्टार टीव्हीच्या व्यवस्थापनाला यावेळी देण्यात आला.
‘ट्राय’च्या धोरणाविरोधात गुरुवारी तीन तास केबल बंद ठेवल्यानंतर आज दुपारी हजारो केबलचालक जांभोरी मैदान येथे एकवटले. मोठय़ा संख्येने निघालेल्या केबलचालकांच्या या मोर्चामुळे वरळी तसेच लोअर परळ परिसरात काही काळासाठी ट्रफिक जॅम झाले.
टीव्ही फोडले, गेटवर धडक
स्टार कंपनीविरोधात केबलचालक संतप्त झाले होते. संतप्त केबलचालकांनी लोअर परळ येथील कंपनीच्या कार्यालयासमोरच टीव्ही फोडले. केबलचालकांना आवरण्यासाठी पोलिसांची कुमक मागविण्यात आली, मात्र तरीही केबलचालकांनी जुमानले नाही.
जाहिरातींच्या उत्पन्नाचा हिस्सा केबल ऑपरेटर, ग्राहकांना द्या!
केबलचालक तसेच मल्टी सर्व्हिस ऑपरेटरना सध्या मिळत असलेला 40 टक्क्यांचा वाटा हा कायम राहिला पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे जर जाहिरातीच्या उत्पन्नातून वाहिन्यांना करोडो रुपयांचा फायदा होत असेल तर त्याचा हिस्सा केबल ऑपरेटर आणि ग्राहकांनाही मिळायला हवा अशी मागणीही करण्यात आली. यावेळी ‘स्टार’च्या व्यवस्थापनाने ‘ट्राय’कडे बोट दाखवले असता तुम्ही 15 दिवसांत ग्राहक आणि केबलचालकांच्या हिताचा निर्णय घ्या अन्यथा आंदोलन तीक्र केले जाईल, असा इशाराच अनिल परब यांनी दिला.
व्यवस्थापनाला शिवसेना स्टाइल इशारा
केबलचालकांच्या दणक्याने व्यवस्थापन खडबडून जागे झाले. अनिल परब यांच्यासह शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले. काँग्रेस आमदार भाई जगताप, माजी आमदार बाळा नांदगावकर हेही या चर्चेत सहभागी झाले. यावेळी अनिल परब यांनी केबलचालक साडेपाचशेहून अधिक चॅनेल 150 ते 350 रुपयांत देत असताना ‘ट्राय’कडून वाहिन्यांच्या बुकेच्या रूपात ग्राहकांवर दरवाढ लादली जात आहे. यामागचे षड्यंत्र ‘स्टार’नेच रचले असून ते आम्ही हाणून पाडू. केबलचालकांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.






























































