
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला मागील लोकसभा निवडणुकीत भरघोस मते ही काही विकासाच्या नावावर मिळाली नव्हती. अयोध्येत ‘राममंदिर’ उभे राहील या आशेपोटी ते मतदान झाले होते. त्यामुळे ‘आता राममंदिर नसेल तर 2019ला मोदीही नसतील,’ असा निर्वाणीचा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी आज दिला. प्रयागराज येथे 15 जानेवारीपासून भरणाऱया कुंभमेळय़ाच्या निमित्ताने हिंदू संत-महंतांनी मोदी सरकारला ‘चले जाव’चा इशारा देणारा डंकाच वाजवला आहे.
हा कुंभमेळा लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भरत असून त्यासाठी ‘आखाडय़ां’चे आगमन प्रयागराज येथे झाले आहे. एका वृत्तवाहिनीने ‘चौपाल’ या कार्यक्रमात राममंदिराच्या प्रश्नावर आखाडय़ांच्या महंतांशी संवाद साधला. त्यात महंत नरेंद्र गिरी महाराज, निरंजनी आखाडय़ाचे प्रमुख महंत केशव पुरी, आनंद आखाडय़ाचे प्रमुख महंत गणेश आनंद सरस्वती हे सहभागी झाले होते.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज म्हणाले की, मोदी आणि त्यांच्या भाजपला मिळालेली मते ही विकासाच्या नावावर असती तर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री दुसरा कोणी असता. कदाचित अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले असते. गोध्रा जळीतकांडानंतर मोदी यांचा हिंदुत्ववादी चेहरा समोर आला. त्यामुळे हिंदू समाजाला वाटले की, दिल्लीत मोदी आणि उत्तर प्रदेशात योगी असतील तर अयोध्येत राममंदिर उभे राहील असे नरेंद्र गिरी महाराजांनी सांगितले. मोदी सरकारच्या राजवटीत भले वीज मिळत असेल, रस्ते बनत असतील, विकास होत असेल पण लोकांचे मतदान हे फक्त राममंदिरासाठीच असेल. त्यामुळे तुम्ही राममंदिर उभारणार नसाल तर मात्र कठीण आहे. मग मोदी आणि त्यांच्या भाजपचे काही खरे नाही असा इशाराच त्यांनी दिला.
राममंदिर बनणार नाही असेच वाटू लागले आहे!
राममंदिर उभारण्याच्या मुद्दय़ावर सरकारचा कल सकारात्मक दिसत नाही. त्यामुळे राममंदिर बनणार नाही असेच आता वाटू लागले आहे. अशा परिस्थितीत आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चातकासारखी वाट पाहत आहोत असे महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी सांगितले. राममंदिराबाबत जनतेची असलेली अपेक्षा-इच्छा काही भाजप सरकारकडून पूर्ण झालेली नाही. त्याची किंमत 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोजावीच लागेल असे गिरी महाराज म्हणाले.
राममंदिर निर्माण होत नसल्याने महंत, साधुसंतांमध्ये तीव्र नाराजी आहे. कारण हा प्रश्न हिंदू जनतेच्या श्रद्धेचा आहे. पण सरकारचे हात बांधलेले दिसतात.
– महंत गणेश आनंद सरस्वती,
प्रमुख, आनंद आखाडा
प्रयागराज येथे भरणाऱया कुंभमेळय़ातच ‘विश्व हिंदू परिषद’ धर्मसंसद भरवणार असल्याची चर्चा आहे. पण धर्मसंसद चार पीठांचे शंकराचार्यच बोलावू शकतात. तो अधिकार कोणत्याही पक्ष-संघटनेला आणि विश्व हिंदू परिषदेलासुद्धा नाही.
-महंत नरेंद्र गिरी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद
मोदी सरकारची साडेचार वर्षे सरली आहेत पण राममंदिराबाबत सरकार काही विचार करताना दिसत नाही. मंदिर बनले तरच भाजपचे सरकार वाचेल. मंदिराशिवाय भाजप पुन्हा सत्तेवर येणे अशक्यच आहे.
-महंत केशव पुरी, प्रमुख, निरंजनी आखाडा




























































