मोदींनी ऑगस्टा वेस्टलॅण्डला ‘मेक इन इंडिया’त आणले, काँग्रेसचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाआधीच भाजप आणि काँग्रेस यांच्यात ‘राफेल’ आणि ‘ऑगस्टा-वेस्टलॅण्ड’ या प्रकरणांवरील लढाई तीव्र होऊ लागली आहे. ‘चोर शोर मचा रहा है’ अशा शब्दात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर शनिवारी हल्ला चढवला होता. त्यानंतर ‘आम्ही काळय़ा यादीत टाकलेल्या ‘ऑगस्टा- वेस्टलॅण्ड’ या कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मार्च 2015 रोजी ‘मेक इन इंडिया’त सहभागी करून घेतले असा पलटवार काँग्रेसने आज केला.

मोदी सरकार हे ‘ऑगस्टा- वेस्ट लॅण्ड’ कंपनीचे सहकारी बनले आहे. आपल्या काळय़ा कारनाम्यांच्या प्रकरणांमध्ये केवळ स्वतःला वाचवण्यासाठीच मोदी हे त्या कंपनीचे हितचिंतक, रक्षक आणि पालनकर्ते बनले आहेत असा स्पष्ट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला. ‘ऑगस्टा- वेस्ट लॅण्ड’ प्रकरणात काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात खोटे व कपोलकल्पित जबाब देण्यासाठी दलाल क्रिश्चियन मिशेल याच्यावर पंतप्रधान मोदी आणि ‘ईडी’ने दबाव आणला होता. ही गोष्ट मिशेलची बहीण आणि आईने जुलै महिन्यातच प्रसारमाध्यमांसमोर सांगितली होती, याची आठवण काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी करून दिली.

‘ऑगस्टा- वेस्ट लॅण्ड’ प्रकरण काँग्रेस-यूपीए सरकारनेच 12 फेब्रुवारी 2013 रोजी चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवले होते असे त्यांनी सांगितले.
हे प्रकरण चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे सोपवण्याचा प्रस्ताव काँग्रेसचे त्यावेळचे संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनी यांनी 27 फेब्रुवारी 2013 रोजीच भाजपसमोर ठेवला होता. पण त्यावेळी भाजप नेत्यांनीच त्यात स्वारस्य दाखवले नव्हते, अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.

कुठल्याही चौकशी यंत्रणेवर आता विश्वास उरला नाही – सिब्बल
‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ची बाजू मांडणारा सरकारी वकील न्यायालयात राजकारण करीत आहे. तसे निर्देश त्याला पंतप्रधानांकडून मिळालेत हे स्पष्ट होते. ‘इटालियन महिलेचा मुलगा…’ ही न्यायालयातील विधानेतर धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहेत. आता कोणत्याच चौकशी यंत्रणेवर आमचा विश्वास उरलेला नाही, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले.

‘ऑगस्ट वेस्टलॅण्ड’ का कंपनीला काळय़ा यादीत टाकून यूपीएचे सरकार तेवढय़ावरच थांबले नाही. त्या कंपनीकडून 228 मिलियन यूरोची बँक गॅरंटीही जप्त करण्यात आली होती.
– रणदीप सुरजेवाला, प्रवक्ता, काँग्रेस

काँग्रेसचे सवाल
मोदी सरकारने ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’ या कंपनीला 22 ऑगस्ट 2014 रोजी काळय़ा यादीतून बाहेर का काढले?
त्या कंपनीला 3 मार्च 2015 रोजी ‘मेक इन इंडिया’चा भाग का बनवले?
हिंदुस्थानी नौदलासाठी 100 हेलिकॉप्टर्सची बोली लावण्यासाठी ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’सारख्या ‘ब्लॅक लिस्टेड’ कंपनीला अनुमती का दिली?
मोदींनी ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’च्याच मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीला काळय़ा यादीतून बाहेर का काढले?
ऑगस्टाला एडब्ल्यू 119 ही हेलिकॉप्टर्स बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘एफआयबीपी’ची अनुमती मिळवून परवानगी का दिली?
‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’च्या विरोधातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील खटल्यात हार झाल्यानंतर मोदी सरकारने पुढे ‘अपील’ का केले नाही?