प्रत्येक घोटाळ्यात एकाच कुटुंबाचे नाव येतेच कसे? मुख्यमंत्र्यांचा वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-devendra-fadnavis

सामना प्रतिनिधी, मुंबई

बोफोर्स असो, पाणबुडी असो की आताचा ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळा असो, प्रत्येक घोटाळ्यात एकाच कुटुंबाचे नाव येते कसे याचे उत्तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आता द्यावे लागेल असा वार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळय़ात एकूण 225 कोटी रुपयांची लाच वाटण्यात आली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.

ऑगस्टा केस्टलॅण्ड खरेदी प्रकरणात परदेशी संस्थांनी केलेल्या तपासात, न्यायालयांच्या निर्णयात ही नाके उघड झाली आहेत. मध्यस्थ ख्रिस्तियन मिशेल याच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या कागदपत्रांत श्रीमती गांधी,‘आर’, एका इटालियन महिलेचा मुलगा जो पंतप्रधान होऊ शकतो, ‘एपी’ असे संदर्भ पुढे आले आहेत. मिशेलला जेव्हा हिंदुस्थानात आणले तेव्हा काँग्रेसनेच आपला एक नेता त्याला वकील म्हणून दिला. मिशेलला भेटायला जेव्हा त्याचा वकील गेला तेव्हा त्याने सोनिया गांधी यांच्याबद्दल जर मला प्रश्न विचारले तर काय उत्तरे द्यायची अशी विचारणा करणारी एक चिठ्ठीही त्या वकिलाला दिली.

या हेलिकॉप्टरच्या सौद्याची फाइल संरक्षण विभागात जेव्हा एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जायची तेव्हा प्रत्येक हालचालीची एक कॉपी मिशेल आणि हॅश्के या व्यक्तींकडे जायची. देशाच्या संरक्षणाशीदेखील हा एक धोका आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला या व्यवहारातूनही बाहेर काढण्यात आले होते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कालपर्यंत ‘चोर,चोर’ ओरडणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आता या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसची वकिली सुरू केली असून तसे करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही, असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.

ऑगस्टावरून धुमश्चक्री
‘राफेल’ घोटाळय़ावरून विरोधकांनी पुरेपूर घेरलेल्या मोदी सरकारने ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’ प्रकरणाचा आपल्या बचावासाठी ढालीसारखा वापर सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टार्गेट करण्यासाठी भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदा घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच धुमश्चक्री सुरू आहे.