पारा घसरला, वीज गोठली,एसी- पंख्यांचा वेग मंदावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

तापमानाचा पारा कमालीचा घसरल्याने राज्यात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यापासून सुसाट धावणाऱया एसी, पंखी, कूलरचा वेग मंदावल्याने विजेची मागणी पुरती गोठली आहे. वाढत्या उकाडय़ामुळे ऑक्टोबरमध्ये 25 हजार मेगावॅटपर्यंत पोहचलेली विजेची मागणी गेल्या तीन-चार दिवसांत सोळा हजार मेगावॅटपर्यंत खाली आली आहे. विजेच्या घटलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अनेक वीजनिर्मिती संच बंद ठेवावे लागत आहेत.

राज्यात ‘महावितरण’चे जवळपास दोन कोटी 40 लाख ग्राहक असून त्यांच्याकडून  दररोज सुमारे 18 हजार मेगावॅट तर मुंबईत वीजपुरवठा करणाऱया बेस्ट, टाटा आणि अदानी या वीज कंपन्यांकडे अडीच-तीन हजार मेगावॅट एवढी मागणी नोंदवली जाते तर ऑक्टोबरमध्ये वाढलेल्या उकाडय़ामुळे ‘महावितरण’कडे 21 हजार 500 मेगावॅट तर मुंबईतील वीज कंपन्यांकडे साडेतीन हजार मेगावॅट एवढी मागणी नोंदवली होती.

आठवडाभरापासून थंडीचे प्रमाण वाढल्याने विजेची मागणी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शुक्रवार 28 डिसेंबर रोजी ‘महावितरण’कडे 13 हजार 360 मेगावॅट तर मुंबईची 1900 मेगावॅट एवढी कमी विजेची मागणी नोंदली आहे. याभोवतीच विजेच्या मागणीचा काटा फिरत असून रविवारी 14 हजार 900 मेगावॅट तर मुंबईत 1850 एवढी मागणी होती. वीज वितरण कंपन्यांकडेच विजेची मागणी कमी नोंदली जात असल्याने महानिर्मितीसह अनेक खासगी वीज प्रकल्पांमधील वीजनिर्मिती कमी करण्यात आली आहे.

‘महावितरण’कडे नोंदलेली विजेची मागणी (मेगावॅटमध्ये)
शुक्रवार    13 हजार 360
शनिवार    15 हजार 900
रविवार    14 हजार 947
सोमवार    16 हजार 500