
सामना ऑनलाईन। फरीदाबाद
बिहारमधील बडखल येथे शनिवारी एका (21) इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण तिच्या आत्महत्येचे कारण मात्र कळत नव्हते. सुखवस्तू घरातील ही तरुणी सर्वांचीच लाडकी होती. तिचा कोणाबरोबर वादही नव्हता. यामुळे पोलीसही चक्रावले होते. पण शवविच्छेदन करताना डॉक्टरांचे लक्ष तिच्या हातावरच्या मेंदीकडे गेले आणि तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडले.
संबंधित तरुणी मूळची पाटणाची असून वडिलांची बदली झाल्याने ती कुटुंबीयांसह बडखल येथे राहात होती. पाटणा येथे पदवीचे शिक्षण घेत असताना तिची मैत्री एका तरुणाबरोबर झाली होती. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर मात्र त्याने लग्नास नकार दिला. यामुळे तरुणी निराश झाली. ती घरातल्यांबरोबरही बोलेनाशी झाली होती. तिने शनिवारी हातावर मेंदी काढली. मेंदी सुकल्यानंतर तिने हात धुतला त्यानंतर ती तिसऱ्या मजल्यावर गेली व तिने गच्चीवरून खाली उडी मारली.
त्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांचे लक्ष तिच्या हातावरच्या मेंदीकडे गेले. मेंदीतील नक्षीमध्ये काही आकडे व अक्षर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ती जुळवून पाहील्यानंतर त्यात तरुणीने मोबाईल क्रमांक व आत्महत्येचे कारण लिहल्याचे समोर आले. एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे आमिष दाखवले व आपली फसवणूक केली असा आरोप तिने त्यात केला होता. दरम्यान, पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.






















































