लातूर : एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर 5 वर्षाचा प्रतिबंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर येथील एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यांच्यासह दोघा प्राध्यापकांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परीक्षेच्या कामकाजा संदर्भात पाच वर्षाचा प्रतिबंध लावला आहे. अभियांत्रिकी परीक्षेतील गुणवाढ घोटाळा प्रकरणात युवासेना सहसचिव तथा सिनेट सदस्य प्राध्यापक सुरज दामरे यांनी पाठपुरावा करून विद्यापीठास कारवाई करण्यास भाग पाडले.

लातूर येथील एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेचे मूल्यांकन केंद्र सुरू करण्यात आलेले होते. या मूल्यांकन केंद्राचे संचालक म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस बी खटोड हे कामकाज पाहत होते. या मुल्यांकन केंद्र मध्ये ठराविक विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आलेले होते. पुनर्मुल्यांकन हे गुण वाढवण्यात आले होते. तब्बल 17 उत्तरपत्रिका वर व्हाइटनर लावून विद्यापीठाच्या नियमाचा भंग करण्यात आलेला होता.

युवा सेनेचे सहसचिव तथा सिनेट सदस्य प्राध्यापक सुरज दामरे यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. विद्यापीठ प्रशासनाकडे, कुलगुरू आणि राज्यपालांकडे तक्रारी दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यास भाग पाडले. विद्यापीठाच्या वतीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल दिल्यानंतर तो अहवाल परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. या बैठकीतील ठरावानुसार विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. बी. खटोड यांना मूल्यांकन केंद्राचे संचालक म्हणून काम करण्यास पाच वर्षाचा प्रतिबंध लावला आहे. या घोटाळ्यातील दुसरे प्राध्यापक आर एस खंडेलवाल यांना परीक्षेच्या कामापासून पुढील पाच वर्षापर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या घोटाळ्या मधील सहभागी प्राध्यापिका श्रीमती शुभांगी कवठाळे यांनाही परीक्षेच्या कामातून पुढील पाच वर्षापर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे. युवा सेनेच्या दणक्यामुळे विद्यापीठास ही कारवाई करणे भाग पडले आहे.

एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. बी. खटोड हे केवळ प्राध्यापक आहेत मात्र विद्यापीठाने त्यांना थेट डॉक्टरेट ही पदवी बहाल करून प्रतिबंधाची कारवाई केली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना युवासेना सहसचिव प्राध्यापक सुरज दामरे यांनी सांगितले की, विद्यापीठातील काही ठराविक व्यक्तीमुळे विद्यापीठाचे नावलौकिकास गालबोट लागत आहे. विद्यापीठातील गैरव्यवहार रोखण्यासाठी युवा सेना यापुढे काम करत राहील. विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही.