
सामना प्रतिनिधी । टेंभूर्णी
शेत जमीनीची वहीवाट व त्यातील रस्ता अडवल्याच्या कारणावरून शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा गुरूवारी रात्री १० ते ११.३० वाजण्याचा सुमारास डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना माढा तालुक्यातील तांबवे (टें.) येथे घडली. महादेव वामन गोडसे असे खून झालेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव असून संशयीत बापूराव भानूदास चट्टे यास अटक करुन टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबवे येथील महादेव वामन गोडसे यांचे चुलत बंधू आनंद भिमराव गोडसे यांनी ८ ते ९ वर्षापुर्वी बापूराव भानुदास चट्टे वय ५६ रा. निमगांव ता. माढा यांच्या भावाची पावणे तीन एकर माळरान जमीन खरेदी केली होती. चार महिन्यापुर्वी त्या माळरानातून जाणारा रस्ता बापूराव चट्टे यांनी अडवला होता. त्यामुळे गोडसे यांनी स्वत:च्या शेतातून रस्ता तयार केला आणि बापूराव चट्टे यांच्या शेतात जाणारा रस्ता अडवला होता. आपल्या शेतात महादेव गोडसे ट्रॅक्टरने नांगरट करत असताना बापूराव चट्टे व त्याच्या कुटूंबियांनी महादेव गोडसे यांना शिवीगाळ केली होती. यावरून ४ नोव्हेंबर रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल केली होती. यावरून मयत महादेव गोडसे यांची पत्नी शुभांगी गोडसे यांनी संशयीत बापूराव चट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.




























































