
सामना प्रतिनिधी । संगमनेर
तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या मुक्त गोठ्यात घुसून बिबट्याने धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी 25 ते 30 गायींनी भीतीपोटी केलेल्या प्रतिहल्ल्यात दीड वर्ष वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात एक कालवड जखमी झाली आहे.
उंबरी-बाळापूर शिवारात सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांचे गट नं. 182 मध्ये राहते घर व गायींचा मुक्त गोठा आहे. त्यामध्ये लहान-मोठी अशी 25 ते 30 जनावरे आहेत. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गायींच्या मुक्त गोठ्यात एका बिबट्याने प्रवेश केला. त्यामुळे गोठय़ातील गायी भीतीपोटी सैरावैरा पळत सुटल्या. गायी मोठमोठ्याने हंबरत होत्या. गायींचा आवाज ऐकून सूर्यभान उंबरकर, शंशिकात उंबरकर, संतोष उंबरकर आदीसह कुटुंबातील महिलांनी बाहेर येऊन पाहिले. यावेळी गोठय़ात गाई सैरावैर पळताना दिसल्या व एक बिबट्या त्यांच्या पायाखाली तुडवला जात असल्याचे दिसले. यावेळी या कुटुंबाने तत्काळ याबाबत वनविभागाला माहिती दिली, तर गोठ्याबाहेर आणखी एक बिबट्या असल्याचे या कुटुंबाच्या लक्षात आल्याने हे कुटुंब घाबरले व त्यांना आरडाओरडा सुरू केला.
आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ व माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक डांगे, आल्हट व गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी यांनी गोठय़ात जाऊन पाहिले असता गायीच्या पायाखाली ऐऊन दीड वर्षाचा नर जातीचा बिबट्या मृत झाल्याचे आढळले, तर एका कालवडीला बिबट्याने ओरबाडत जखमी केले होते. याप्रसंगी वनअधिकार्यांनी घटनेचा पंचनामा करुन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, या परिसरात बिबट्याचे प्रमाण अधिक असून, शेतकर्याच्या पशुधनावर हल्याच्या घटना नियमित घडत असतात. काही दिवसांपूर्वी परिसरातील नितीन उंबरकर यांच्या गायीवर व प्रल्हाद शिदे यांच्या बोकडावर बिबट्याने हल्ला केला होता, तर या घटनेतील थरार अनुभवल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






















































