
सामना प्रतिनिधी, टिटवाळा
देणाऱयाने देत जावे… या उक्तीचा प्रत्यय मांडा टिटवाळा येथे आला आहे. पालिकेच्या गार्डनसाठी जागा अपुरी पडत असल्याने येथील पाटील कुटुंबीयांनी आपल्या मालकीची जवळपास अर्धा एकर जागा मोफत दिली. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे मांडा टिटवाळावासीयांना हक्काचे गार्डन मिळाले आहे.
सावरकरनगर रोडवर पालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनेचे कल्याण उपशहरप्रमुख किशोर शुक्ला यांच्या पुढाकाराने गार्डन विकसित झाले आहे. गार्डनला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान असे नाव देण्यात आले आहे. मात्र गार्डनसमोर अतिक्रमणे झाल्यामुळे गार्डनमध्ये येण्यास नागरिकांना अडथळे होत होते. यापार्श्वभूमीवर गार्डन विकसित करण्याचा निर्णय किशोर शुक्ला यांनी घेतला. यासाठी बगिच्या समोर असलेली काही मोकळी जागा पाटील कुटुंबीयांची होती. शुक्ला यांच्या विनंतीनुसार या कुटुंबाने पालिकेला सर्व जागा विनामूल्य हस्तांतरित केली. नुकताच या कामाचा शुभारंभ झाला.
यांनी जपले सामाजिक भान
या सामाजिक कामासाठी यशवंत पाटील, केशव पाटील, नरेश पाटील, रेवनाथ पाटील, प्रल्हाद पाटील, रामेश्वर पाटील, ललित पाटील, गजानन पाटील, रवींद्र पाटील, जय पाटील, पप्पू पाटील, लक्ष्मण पाटील, शब्बीर खान, भास्कर पाटील, सोमनाथ पाटील, सुभाष पाटील, भिवा पाटील, सुरेश पाटील, योगेश पाटील, परेश पाटील यांनी मोफत जागा दिली.



























































