
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील वेताळ बांबार्डे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक संजय मालवणकर यांना न्याय मिळवून दिल्यानंतर संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार असल्याचे पणदूर सरपंच दादा साईल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दया अणावकर, समिधा पालव, सेजल हुमरसकर, अवधूत सामंत यांच्यासह पणदूर पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्याध्यापक मालवणकर यांना न्याय मिळण्यासाठी नागरिकांनी छेडलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थी, पालक, नागरिक, लोकप्रतिनिधी, कुडाळ पोलीस व विविध शिक्षक संघटनांचे त्यांनी आभार मानले. तसेच 14 जानेवारीचे स्नेहसंमेलन रद्द झाल्याने मुलांचा हिरमोड झाला आहे. हे स्नेहसंमेलन 19 जानेवारी रोजी त्याच मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यास संस्थेला भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विद्यमान संस्था पदाधिकारी यांना संस्था आपली मालमत्ता वाटत आहे. त्याचप्रकारचे वर्तन त्यांचे आहे. यामुळे 2004 पासून 8 मुख्याध्यापकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. संस्थेचे अद्याप 40 सभासद आहेत. त्यांना संस्थेसाठी जमीन देणाऱ्या, काबाडकष्ट करून संस्था उभी करणाऱ्या व्यक्तींचा विसर पडला आहे. त्यामुळे संस्था संचालक बरखास्त करून नवीन कार्यकारिणी आणणार आहोत. त्यात शेतकरी, महिला असतील. मात्र, संस्थेचा शैक्षणिक दर्जा खालावू देणार नाही, असे यावेळी साईल यांनी सांगितले.

























































