अनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला? वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी फिरकी गोलंदाज आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे याने भाजपमध्ये प्रवेश केल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फेसबुक आणि ट्विटरवर यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल कुंबळे यांचा एक फोटोही जोडण्यात आलेला आहे. यात पंतप्रधान मोदी एक फुलांचा गुच्छ कुंबळेला देताना दिसत आहे. हिंदी, इंग्रजीसह बांगला भाषेमध्ये ही पोस्ट आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोसह एक कॅप्शनही देण्यात आले आहे. ‘अनिल कुंबळे याने देशप्रेमी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एक दिवस संपूर्ण देशात कमळ उमलेल’, असे कॅप्शन देण्यात आले आहे. परंतु या पोस्टमध्ये दाखवण्यात आलेले फोटोचे सत्य मात्र वेगळे आहे. तसेच याबाबत अनिल कुंबळे याच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला तेव्हा त्याने यास साफ नकार दिला.

कुंबळेने हा दावा नाकारला असला तर फोटोमागील सत्य काय आहे पाहणेही आवश्यक होते. त्यामुळे या फोटोबाबत गूगलवर अधिक माहिती मिळवली असता एक वेगळेच सत्य बाहेर आहे. पीएमओ इंडियाच्या ट्विटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक लिंक मिळाली. ही पोस्ट 1 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आलेली होती. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध होते.