
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि काँग्रेस नेते अल्पेश ठाकोर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बिहारींविरोधात राज्यात झालेल्या हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मुझफ्फरपूर येथील स्थानिक न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने रुपाणी व ठाकोर यांना बिहारींविरोधात हिंसा भडवण्याच्या प्रकरणातील आरोपी मानत हे आदेश दिले आहेत.
2018 मध्ये गुजरातमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर बिहारी लोकांविरोधात हिंसाचार सुरू झाला होता. बिहारी लोकांना राज्य सोडण्याचेही सांगण्यात आले होते. यादरम्यान अल्पेश ठाकोर यांच्याशी संबंधीत संघटनेने बिहारी लोकांवर अत्याचार करत हिंसाचार भडकावला होता. याच प्रकरणी सामाजिका कार्यकर्ते तमन्ना हाशमी यांनी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने कलम 153, 295 आमि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे कांति पोलीस स्थानकाला आदेश दिले आहेत.
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अल्पेश ठाकोर यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तर रुपाणी यांनी प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.



























































