चिपी विमानतळावर लवकरच विमान सेवा सुरू होणार : विनायक राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

चिपी विमानतळाचा ‘उडाण’ योजनेत समावेश करण्यात आला असून लवकरच या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेने कोट्यवधी रूपयांची विकासकामे केली आहेत. इकोसेन्सिटीव्हचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावला जाणार आहे असे प्रतिपादन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी केले. तसेच जिल्ह्यातील युवासेनेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

शिवसेनाप्रमुख हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग युवासेनेच्या वतीने पिंगुळी म्हापसेकरतिठा येथील श्री देव रवळनाथ सभागृहात बुधवारी मिरी लागवड-तंत्रज्ञान मार्गदर्शन व मिरी रोप वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.पं.सदस्य संजय पडते आदींसह शिवसेना- युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

राऊत म्हणाले, जिल्ह्यात शिवसेनेने कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. सोनवडे घाट रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा झंझावात देशभर सुरू असून प्रत्येकाच्या हृदयात त्यांचे विचार पोहचले आहेत. त्यांच्या शिकवणीनुसार शिवसेना-युवासेना काम करीत आहेत. जिल्ह्यात युवासेना राबवत असलेले विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून यापुढेही असेच समाजपयोगी उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी केले. वैभव नाईक यांनी युवासेनेने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करीत जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व सहकार्‍यांचे अभिनंदन केले. पुढील काळातही युवासेनेने जिल्हाभर असेच समाजयोगी उपक्रम राबवुन शासनाच्या योजना प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोचवाव्यात. जिल्हातील शिवसैनिक व युवासैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले काम करीत आहेत. राऊत यांच्या माध्यमातुन अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. चांदा ते बांदा योजना पालकमंत्री केसरकर यांनी हाती घेवून शेतकर्‍यांना सक्षम करण्याचे काम केले आहे. शासनाच्या योजनांचा फायदा घेवून शेतकर्‍यांनी दुप्पट उत्पन्न करावे असे आवाहन त्यांनी केले. आगामी निवडणूकीत विनायक राऊत यांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडुन देण्याचे आवाहनही त्यांनी केले.