‘रेडी’ची पूजा राणे ‘शतकोत्सव सुंदरी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवण पालिकेच्या शतक महोत्सवानिमित्त टोपीवाला बोर्डिंग मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शतकोत्तर सुंदरी स्पर्धेत रेडी (वेंगुर्ला) येथील पूजा राणे हिने शतकोत्तर सुंदरीचा बहुमान पटकाविला. सावंतवाडीच्या भक्ती जामसंडेकरने द्वितीय तर रत्नागिरीच्या दिव्या शिंदे हिने तृतीय क्रमांकासह गौरवण्यात आले.

पालिकेच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने बोर्डिंग मैदान येथे रात्री शतकोत्तर सुंदरी स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सिमरन सावंत, भक्ती जामसंडेकर, सानिया वैद्य, गायत्री अमरे, माधुरी मेस्त्री, विधिता मोंडकर, धनलक्ष्मी जाधव, पूजा राणे, समिक्षा कुलकर्णी, समिधा हातखांबकर, आरती निकम, ऋतू गोवेकर, फराज पटेल, गौरी जोशी, दिव्या भोगावकर, रागिणी लंगोटे, दिव्या शिंदे, तेजल सावंत, हेमलता गावकर, 19 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. स्पर्धकांची ओळख, कॅटवॉक, सादरीकरण, परीक्षकांचे प्रश्‍नोत्तरे अशा फेर्‍या पार पडल्या. अंतिम फेरीत केवळ दहा सौंदर्यवतींची निवड झाली. अंतिम फेरीत परीक्षकांच्या उत्तरांना योग्य उत्तरे देताना रेडीच्या पूजा राणे हिने शतकोत्तर सुंदरीचा बहुमान पटकाविला. तिला मुकुट, मानाचा जरीपट्टी व रोख 15 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सावंतवाडीच्या भक्ती जामसंडेकरने द्वितीय तर रत्नागिरीच्या दिव्या शिंदेने तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना अनुक्रमे 10 हजार, 5 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत बेस्ट स्माइल म्हणून ऋतू गोवेकर, बेस्ट कॅटवॉक दिव्या शिंदे तर फोटोजेनिक फेस सिमरन सावंत यांची निवड झाली. त्यांना मानाचा जरीपट्टी, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्रणय तेली, श्‍वेता यादव यांनी काम पाहिले.