वृद्ध दांपत्याचा विहिरीत पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी

परसबागेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असतांना विहीरित पडून गावराई तेलीवाडी येथील हरिश्चंद्र नारायण मयेकर (70) आणि वैजयंती हरिश्चंद्र मयेकर (68) या वृद्ध दांपत्याचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे मयेकर कुटुंबासह गावराई गावावर शोककळा पसरली आहे.

कुडाळ तालुक्यातील गावराई तेलीवाडी येथे राहणाऱ्या मयेकर दांपत्याने बुधवारी आपल्या परस बागेतील पाला पाचोळ्याची व्हिलेवाट लावण्यासाठी तो पेटवला होता. मात्र आग बघता बघता पसरली. यामुळे हादरलेल्या मयेकर दांपत्याने आग विझवू लागले. पण वाऱ्यामुळ आग अधिकच भडकली व आगीच्या ज्वाळा विहीरीवर बसविण्यात आलेल्या पंपाकडे सरकू लागल्या.यामुळे आग विझविण्यासाठी मयेकर दांपत्य विहिरीजवळ गेले . पण आगीमुळे सर्वत्र धूर पसरला होता. यातच कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने वैजयंती यांचा तोल जाऊन त्या विहीरित कोसळल्या. आपली पत्नी विहिरीत पडली आहे हे लक्षात येताच आपल्या वयाचा व जीवाचा विचार न करता हरिश्चंद्र यांनीही विहिरीत उडी मारली. त्यामुळे या दोघांचाही बुडुन मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

फोन केल्याने उघड झाली घटना
परस बागेला लागलेली आग पाहता शेजारी राहणाऱ्या जगताप कुटुंबाने मयेकर यांना फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे जगताप यांनी मयेकर यांच्या घरी जावून पाहणी केली असता ते घरात दिसून आले नाहीत. आजूबाजूला पाहिले असता विहिरीजवळ त्यांची चप्पल दिसून आली. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता वृद्ध मयेकर दांपत्य विहिरीत मृतावस्थेत दिसून आली. याबाबतची खबर जगताप यांनी पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी लागलीच याबाबत ओरोस पोलिसांना कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, सहा. पोलीस निरीक्षक शिवप्रसाद पवार, पोलीस उपनिरीक्षक रवि जाधव, पोलिस हवालदार एम एन पडणेकर, आर के राठोड, पोलीस नाईक आशिष शेलटकर आदींनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ शुभम राठीवडेकर यांच्या मदतीने वृद्ध मयेकर दांपत्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर हरिश्चंद्र मयेकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागलेला दिसून आला. तर वैजयंती या विहिरीतील चिखलात रुतलेल्या अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यामुळे पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीमध्ये उतरत असताना हरिश्चंद्र यांचा हात सुटुन ते विहिरीच्या दगडाला आपटले असावे आणि पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.