
सामना प्रतिनिधी । परभणी
शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ या मार्गावरील उड्डाणपुल ते खानापूर फाटा या रस्त्यावरील एक मार्गी रस्त्यावर डांबरीकरणाचे काम जोमाने सुरु करण्यात आले होते. हे काम अत्यंत दर्जाहिन पद्धतीने केले जात असताना तब्बल २ महिने उलटले तरीही उर्वरीत कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. या रस्ता दुरुस्तीच्या कामास मुहूर्त कधी लागणार? याकडे आता परभणीकरांच्या नजरा लागल्या आहेत.
परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यासह शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वारंवार मागणी करुनही रस्ता दुरुस्त केला जात नव्हता. रस्ता दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी विविध पक्ष संघटना त्याचबरोबर शिवसेनेनेही आंदोलन केले होते. मोठ्या खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून रस्ता दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्यातच विद्यापीठातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे विशेष अभिवक्ता अॅड. उज्वल निकम यांनी परभणीतील रस्त्यांबाबत आपल्या भाषणातून आवाज उठवला होता. यावेळी त्यांनी परभणीतील रस्त्यांसंदर्भात थेट दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे सांगीतले होते. त्यानंतर लगेचच दोन दिवसात उड्डाणपुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली.
८ ते १५ दिवसात उड्डाणपुल ते खानापूर फाटा या रस्त्यावर डाव्या साईडने काम सुरु करण्यात आले. हे काम अत्यंत दर्जाहीन पद्धतीने केले जात असताना अचानक काम बंद करण्यात आले. परिणामी दुसर्या बाजुचे काम रखडले ते अद्यापही करण्यात आले नाही. याकामास आता कधी मुहूर्त लागणार आहे? असा संपप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावर अद्यापही जागोजागी खड्डेच खड्डे असल्याने अनेकवेळा वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. दोन महिने उलटले तरीही रस्ता दुरुस्तीचे काम सुरु होणार कि नाही, याबद्दल सध्या उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. लवकरच मार्चअखेर कामामध्ये या रस्त्याचे काम उरकले तर जाणार नाही ना? असाही सवाल केला जात आहे.
दर्जाहीन रस्ता तयार करुन केवळ बोळवण केली जात आहे. चांगल्याप्रतीच्या रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरु लागली आहे. विकासासाठी आवश्यक रस्ते, पोटातले पाणी हलणार नाही? असे रस्ते होणार, अशी स्वप्ने पाहत असताना सध्या तरी परभणीकरांना खड्ड्याशी सामना करणे क्रमप्राप्त झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांना गेल्या अनेक वर्षापासून डांबर म्हणजे काय ? हेच माहित नाही, अशी आवस्था या रस्त्यांची झाली आहे. पावसाळा उलटूनही अजुनही रस्ते उखडलेल्या आवस्थेतच जागोजागी दिसत आहेत. यावरुन वाहने चालविणे ही एक जिकरीची बाब झाली असून छोटे-मोठे अपघात ही नित्याची बाब बनली आहे. रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची होऊन बसली आहे. रस्त्याच्या कामासाठी पून्हा एकदा आंदोलन करावे तर लागणार नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

























































