बारावीच्या परीक्षा सुरळीत; शिक्षकांचे आंदोलन स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam-papers
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अकरावी, बारावीच्या शिक्षकांनी पुकारलेले असहकार आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आता बारावीच्या लेखी परीक्षा सुरळीत पार पडणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बुधवारी काढलेल्या मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज महासंघाच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. या भेटीत सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. 2012-13 पासून नियुक्त शिक्षकांना मान्यता द्यावी. 2011-12 पासूनचे वाढीव पदांच्या प्रस्तावांवर त्वरित निर्णय आदी मागण्यांवर तत्काळ शासन अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी बारावी परीक्षांवरील असहकार आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.