राजू शेट्टींची कारखानदारशी मिलीभगत! ऊस आंदोलक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shirol-protest-farmer

सामना प्रतिनिधी । शिरोळ

ऊसाला एफआरपीप्रमाणे दर न देता 2300 रुपये दर देण्यासंदर्भात कारखानदारशी मिलीभगत करणाऱ्या खासदार राजू शेट्टी व कारखानदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहर शिवसेनेच्या वतीने दहन करण्यात आले.

दरम्यान काही शिवसैनिकांनी 2300 रुपये प्रमाणे सोसायटीला जमा झालेल्या बिलाच्या पावत्या प्रतिकात्मक पुतळ्यासोबत जाळून जाहीर निषेध नोंदवला.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील नगरपरिषदेच्या चौकात शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी प्रमाणे दर न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर 2300 रुपयाने जमा केल्याच्या निषेधार्थ कारखानदार व खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील म्हणाले कारखानदारांनी गेल्या तीन महिन्यांपासून एफआरपीप्रमाणे दर देण्याचे मान्य करून केवळ शेतकऱ्यांच्या खात्यावर 2300 रुपये जमा केले आणि खासदार राजू शेट्टी यांनी संमती दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखानदारांशी शेट्टी यांनी मिलीभगत केल्याचा आरोप करत उपजिल्हाप्रमुख पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या खासदार राजू शेट्टी आणि कारखानदारांनी सेटलमेंट करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या ऊस दराचा आम्ही जाहीर निषेध करतो.

यावेळी शहर प्रमुख राजू आवळे, बाबासाहेब सावगावे, सुहास पासोबा आदींनी भाषणे केली. यावेळी  विष्णू बाबर, दत्तात्रय कामत, उत्तम माने, अमित आवळे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.