
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
बहुजन वचिंत आघाडी काँग्रेस सोबतची चर्चा जागा वाटपावरून थांबली नाही, तर काँग्रेसने आरएसएसला (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) संवैधानिक चौकटीत आणण्याचं मान्य न केल्यामुळे चर्चा थांबली असल्याचा गौप्यस्पोट भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे पुढारी राजगृहावर जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आले होते. भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखयचे असल्यामुळे काँग्रेस आघाडीची चर्चा करण्यात आली होती. पण काँग्रेस आरएसएस संदर्भात काही बोलत नाही, त्यांना संवैधानिक चौकटीत आणण्याचा अजेंडा आणत नाही, त्यांनी तो अजेंडा आणल्यानंतर आम्ही आमचा आरखडा त्यांना देऊ आणि जागा वाटपा संदर्भात चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
काँग्रेसकडे 12 जागांची मागणी केली असली तरी त्या जागेवर काँग्रेस तीन वेळा परभूत झालेली आहे अशाच जागांची बहुजन वचिंत आघाडीने मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसकडे लिडरशीप राहिली नाही. महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे उमेदवार देण्यासाठी माणसे नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या देशामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहमूत मिळणार नाही तर मिलीजुली सरकार येणार असल्यामुळे भाजपने प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा सपाटा लावला आहे, असेही ते म्हणाले.























































