
>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर
हिंदुस्थानी सैन्याने गेल्या आठवड्यात जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिह्यातील बिन्नेर या गावामध्ये लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. त्यानंतर हा जिल्हा दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आला. कश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधातील लष्करी मोहिमा या रात्रीच्या वेळी राबविण्यात येत आहेत. बारामुल्लातील कारवाईदेखील मध्यरात्री तीन वाजता करण्यात आली. याचाच अर्थ संपूर्ण हिंदुस्थान जेव्हा सुखाची निद्रा घेत होता तेव्हा आपले सैन्य जागता पहारा देऊन, जिवाची बाजी लावत दहशतवादाविरुद्ध लढत आहे. उणे 25 अंशांपर्यंत घसरलेले तापमान, तुफान बर्फवृष्टी होत असताना लढणाऱ्या आपल्या जवानांच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक व्हावयास हवे.
गेल्या 30 वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने उच्छाद मांडलेला आहे. प्रत्यक्ष युद्धात हिंदुस्थानला पराभूत करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने पुकारलेल्या या ‘प्रॉक्सी वॉर’चा मुकाबला करताना आजवर हिंदुस्थानचे असंख्य जवान हुतात्मा झाले आहेत. शेकडो सामान्य निष्पाप नागरिकांचाही बळी गेला आहे. आज तीन दशकांनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. तथापि, या लढ्यातील एक ऐतिहासिक आनंदाचा क्षण गेल्या आठवड्यात आला. जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला हा जिल्हा गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदा दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. याचा अर्थ बारामुल्ला या जिह्यामध्ये एकही स्थानिक दहशतवादी आता अस्तित्वात नाही. ही एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाची घडामोड आहे. जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांची सुरुवात झाल्यानंतरची ही सर्वांत मोठी उपलब्धी आहे.
यातून दोन गोष्टी प्रतिबिंबित होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हिंदुस्थानी लष्कराच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ या मोहिमेअंतर्गत आपले जवान पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात अत्यंत तीव्र लढा देत आहेत. बारामुल्ला जिल्हा दहशतवादमुक्त होणे हे या मोहिमेचे आणि जवानांचे मोठे यश आहे. दुसरीकडे दहशतवादाच्या मुळावर घाव घातला गेला असून दहशतवादाच्या पाठीचा कणा यामुळे मोडला गेला आहे. मागील आठवड्यामध्ये लष्कराने एक मिलिटरी ऑपरेशन राबवले. यामध्ये पाकिस्तानने पोसलेल्या लश्कर-ए-तोयबा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना बारामुल्ला जिह्यातील बिन्नेर या गावामध्ये ठार मारण्यात आले. त्यानंतर हा जिल्हा दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आला. हे तीन दहशतवादी गेल्या तीन वर्षांपासून बारामुल्ला जिह्यामध्ये दडून बसलेले होते आणि अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. मागच्या वर्षी तीन युवकांची हत्या करण्यात आली होती. तत्पूर्वी 2017 मध्ये पोलिसांवर झालेला हल्ला अशा अनेक हल्ल्यांमध्ये हे तीन दहशतवादी सहभागी होते.
या तीन दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये आणि त्यांना ठार मारण्यामध्ये बारामुल्ला जिह्यातील लोकल इंटेलिजन्स किंवा स्थानिक गुप्तवार्ता अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कश्मीर खोऱ्यातील स्थानिकांचे दहशतवादाला समर्थन देण्याचे प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागले आहे. बारामुल्ला आणि श्रीनगर हे दोन्ही शेजारी जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत दहशतवादी हिंसाचाराचे प्रमाण मोठे होते. विशेषतः बारामुल्ला जिल्हा हा दहशतवाद्यांचा गड मानला जात होता. खासकरून हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचे अनेक सक्रिय दहशतवादी या जिल्ह्यामध्ये होते. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये हिंदुस्थानी सैन्याने बारामुल्ला जिह्यामध्ये 50 दहशतवादी मारले आहेत. या 50 पैकी गेल्या वर्षभरामध्ये 35 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
जम्मू आणि कश्मीरमध्ये, पाकव्याप्त कश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन, जमात उद दवा, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांचे प्रशिक्षित दहशतवादी घुसखोरी करून कश्मीरमध्ये प्रवेश करतात. इथे आल्यानंतर त्या भागातील स्थानिक कश्मिरी तरुणांची माथी भडकावण्याचे, त्यांचे ब्रेनवॉश करण्याचे काम या दहशतवाद्यांकडून केले जाते. कालांतराने याच स्थानिकांच्या मदतीने हे पाकिस्तानातून आलेले दहशतवादी कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करतात. गेल्या 30 वर्षांपासून ही कार्यप्रणाली जम्मू आणि कश्मीरमध्ये चाललेली आहे. तथापि, बारामुल्ला जिह्यातील जे तरुण पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या चिथावणीला, भूलथापांना बळी पडले होते त्यांचे व्यवस्थितपणाने समुपदेशन करण्यात आले. या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्यांना परत बोलावण्यात आले आहे. ही फार मोठी उपलब्धी आहे. कारण यामुळेच बारामुल्ला जिल्हा हा दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. वास्तविक, असाच प्रकार किंवा अशीच प्रक्रिया श्रीनगरमध्येही राबवण्यात येत आहे, पण त्यासंदर्भातील औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही.
काही महिन्यांपूर्वी जम्मू-कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आणि आता त्याचे रूपांतर राष्ट्रपती राजवटीमध्ये झाले असून दहशतवादविरोधी कारवाईची सर्व सूत्रे आता लष्कराच्या हाती सोपवण्यात आली आहेत. लष्कर आपली कामगिरी नेहमीप्रमाणेच उत्तम प्रकारे पार पाडत आहे. अर्थात, बारामुल्ला दहशतवादमुक्त झाला असला तरी कश्मीरमध्ये आजही 230 दहशतवादी सक्रिय आहेत. हे दहशतवादी वेगवेगळय़ा जिह्यांत सक्रिय असून विशेषतः उत्तर कश्मीरमध्ये त्यांचा प्रभाव जास्त आहे. हे दहशतवादी एकेका जिह्यांमधून फिरत असतात. तथापि, हिंदुस्थानी लष्कराचा सध्याचा कश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईचा वेग पाहता 230 दहशतवाद्यांचा खात्मा करायला फार वेळ लागणार नाही. लवकरच हे उद्दिष्ट साध्य केले जाईल.
आज इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच लष्कराला जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ही एक संधी मानून तिचे सोने करण्यासाठी आता पावले टाकली गेली पाहिजेत आणि उपाययोजनांचा वेग वाढवला गेला पाहिजे. कश्मीरमधील तरुणांना दहशतवादाकडे आकृष्ट करून घेण्यासाठी इसिसपासून लश्कर-ए-तोयबासारख्या सर्व संघटना टपल्या आहेत. याचे कारण सीमेवरील गस्त प्रचंड वाढल्यामुळे हिंदुस्थानात घुसखोरी करणे अवघड झालेले आहे. त्यामुळे या संघटना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक दहशतवाद्यांना आवाहन करण्याचे काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर समुपदेशन घडवून आणावे लागणार आहे. कारण दहशतवाद्यांना ठार मारण्याचे काम लष्कर करू शकते, पण दहशतवादाकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांना रोखायचे असेल तर विविध स्तरावर, विविध लोकांना सहभागी करून घेऊन एक सर्वसमावेशक समुपदेशन कार्यक्रम आखावा लागणार आहे. यामध्ये स्थानिक धर्मगुरूंचा, प्राध्यापकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. कारण दहशतवाद्यांच्या भूलथापांना बळी पडणारा कश्मिरी तरुण हा सुशिक्षित आहे. म्हणूनच विद्यापीठांमधून, महाविद्यालयांमधून असे समुपदेशनाचे वर्ग चालवावे लागतील. यामध्ये कश्मीरमधील समाजशास्रज्ञ, मानसोपचारतज्ञ यांची मदत महत्त्वाची ठरेल. बारामुल्लातील हिंदुस्थानी लष्कराच्या यशामुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. इतरही जिल्हे येणाऱया काळात अशा प्रकारे दहशतवादमुक्त होऊ शकतात. त्यामुळे आताची वेळ ही चर्चेला सुरुवात करण्यासाठीही योग्य ठरू शकते.
2018 मध्ये जम्मू आणि कश्मीरमध्ये 250 दहशतवाद्यांना ठार केले गेले. चालू वर्षी म्हणजे जानेवारी 2019 मध्ये 19 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये नऊ दहशतवादी मारले गेले आहेत. यावरून असे लक्षात येते की, ‘ऑपरेशन ऑलआऊट’च्या माध्यमातून कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कर अत्यंत निकराने आणि नियोजनबद्धरीत्या दहशतवाद्यांचा बीमोड करत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यासंदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ही सर्व मिलिटरी ऑपरेशन्स मध्यरात्रीच्या सुमारास राबवण्यात येत आहेत. बारामुल्लातील कारवाई ही मध्यरात्री तीन वाजता करण्यात आली. याचाच अर्थ संपूर्ण हिंदुस्थान जेव्हा सुखाची निद्रा घेत होता तेव्हा आपले सैन्य जागता पहारा देऊन, डोळ्यांत तेल घालून जीवाची बाजी लावत दहशतवादाविरुद्ध लढते आहे. सध्या जम्मू-कश्मीरमध्ये कमालीची थंडी असून तापमानाचा पारा उणे 25 अंशांपर्यंत घसरला आहे. तेथे तुफान बर्फवृष्टी होत आहे. अशा वेळी हिंदुस्थानी लष्कर बर्फावर झोपून प्रचंड थंडीमध्ये रात्रीच्या वेळी जागून हे ऑपरेशन राबवत आहेत. देशाच्या प्रत्येक नागरिकाने याबाबत आपल्या सैन्याचे कौतुक करावयास हवे.
(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)



























































