
सामना ऑनलाईन । बंगळुरू
उघड्यावर लघुशंकेला जाणे बंगळुरूमधील राजेश बाबू (26) या युवकाला चांगलेच महागात पडले. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडियाच्या आवारात राजेश बाबू लंघुशंकेला गेले होते. त्यावेळी आपल्या मोबाईलमधील बॅलन्स संपला आहे. आपल्याला तातडीने एक कॉल करायचा आहे, असे सांगत एका व्यक्तीने त्यांचा फोन मागितला. राजेशने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला कॉल करण्यासाठी फोन दिला. मात्र, तो परत मागितला असता, त्या व्यक्तीने राजेश यांना चाकूने भोसकून पळ काढला. राजेशने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. पादचाऱ्यांनी जखमी राजेश यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या भावाला घटनेबाबत कळवले.
राजेश यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. मात्र, ही घटना गंभीर असल्याचे त्यांचा भाऊ रतीश यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी चोरी आणि हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. आपला भाऊ आयटी फर्ममध्ये काम करतो. तो राहत असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी संध्याकाळी 7.30 वाजता नेहमीप्रमाणे या रस्त्याने जात होता. त्यावेळी तो लंघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला गेला. त्यावेळी त्या माणसाने राजेशचा फोन हिसकावला आणि राजेशला भोसकून तो पसार झाला, या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे बंगळुरूसारख्या शहरातील सार्वजनिक शौचालयांची समस्या ऐरणीवर आली आहे. सार्वजनिक शौचालयांच्या अभावामुळे अनेकांना उघड्यावरच लंघुशंकेला जावे लागते. गेल्या काही महिन्यात अशाप्रकारच्या घटना वाढल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.




























































