चिपी विमानतळावरून लवकरच विमान सेवा- दीपक केसरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

चिपी – परुळे विमानतळावरून लवकरच विमान सेवा सुरू होईल. याबाबत दिवसा सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. याबरोबरच नाईट सेवाही तात्काळ सुरू करण्याची आमची मागणी आहे कारण हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटक हे रात्री किंवा पहाटे येण्यास उत्सुक असतात म्हणूनच या ठिकाणी नाईट सेवा लवकर सुरू व्हावी म्हणून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मागणी करणार आहोत. सुरेश प्रभू जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने ही मागणी पूर्ण करतील. त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चार्टर प्लेन सुविधा सुरू होण्यासाठीही बोलणी सुरू आहेत. येत्या चार दिवसांत याबाबत दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चिपी विमानतळबाबत आढावा बैठकीनंतर दिली.

पालकमंत्री केसरकर यांनी शनिवारी चिपी विमानतळावर भेट देत कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन अपुरी राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या कडक सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या व चांदा ते बांदा या योजनेतून परूळेतील काथा उद्योगापर्यंत अकरा केव्ही वीजपुरवठा आला असून तिथून पुढे विमानतळासाठी उद्यापासून वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत तर परुळेबाजार ते विमानतळ रस्ता उद्यापासून काम सुरू करण्याच्या आदेश पालकमंत्र्यांनी दिला आहे. पाट तलाव येथून विमानतळाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या सूचना केल्या असून याचा सर्व्हे तात्काळ करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी प्रांत अधिकारी श्री खांडेकर, वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, संजय पडते, चिपी सरपंच गणेश तारी, सचिन देसाई परूळे उपसरपंच विजय घोलेकर, आय आर बी चे जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे, प्रोजेक्ट मॅनेजर राजेश लोणकर, किरण कुमार, योगेश म्हत्रे, एम आय डी सी चे श्री. रेवणकर यांच्यासह महावितरण, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, व इतर विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.