
सामना प्रतिनिधी । पणजी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना दोन माणसे हाताला धरून घेऊन येतात व घेऊन जातात ही स्थिती पाहावत नाही. पर्रीकर यांनी आता सन्मानाने खुर्ची सोडावी, असा सल्ला काँग्रेस पक्षाने आज शनिवारी दिला आहे.
आमदार मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी येथे काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली.
रेजिनाल्ड म्हणाले, “पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा असे आम्ही त्यांना सांगण्याची गरज नाही. त्यांना स्वत:हून त्यांची स्थिती कळायला हवी. पर्रीकर यांची सध्याची स्थिती पाहिली तर त्यांनी आरोग्याकडेच लक्ष देण्याची गरज आहे. गोव्याची जगासमोर योग्य प्रतिमा जात नाही. फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर हे भाजपाचे दोन आमदार ज्या प्रमाणे सध्या आरोग्याची काळजी घेत आहेत, तशी काळजी पर्रीकर यांनी घ्यावी.” त्यांनी सन्मानाने पायउतार होण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी म्हटले.
दिगंबर कामत यांनी लोकांनी थेट पद्धतीने टीव्हीवर कामकाज पाहिले असल्याचे सांगून म्हणाले, सत्ताधारी व विरोधक आणि एकूण प्रत्येकाची कामगिरी लोकांनी अनुभवली आहे. त्यामुळे जास्त काही बोलण्याची गरज नाही.
रमाकांत खलप म्हणाले, गोव्याला जर योग्य स्थितीतील सक्षम मुख्यमंत्री मिळाला असता तर यावर्षी गोव्याला चांगला अर्थसंकल्प मिळाला असता. पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा दुसऱ्याकडे द्यावा. त्यांनी राजीनामा देऊन घरी जावे असे मी म्हणत नाही पण तात्पुरता तरी दुसऱ्याकडे ताबा देणे गरजेचे आहे.




























































