
सामना ऑनलाईन । दिग्रस
इच्छाशक्ती मजबूत असली की जीवनात समस्त आसमंताला गवसणी घालता येते. त्याला वयाचे बंधन आडवे येत नाही की परिस्थिती ही रोखू शकत नाही. असाच आदर्श येथील शेतकरी कुटुंबातील सदुसष्ट वर्षांच्या सविता विनायकराव पद्मावार यांनी घडविला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील शिवाजी नगर मध्ये राहणाऱ्या पद्मावार शेतकरी कुटुंबावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. एका शेतकरी कुटुंब परिवारातील गृहिणी असलेल्या सविता विनायकराव पद्मावार यांनी वयाच्या पासष्टीमध्ये चक्क आकाशाला गवसणी घातली आहे. त्यांनी चक्क पंधरा हजार फुटावरून स्कायडायविंग करून या रोमांचक खेळ प्रकारात या वयोगटातील देशातील सर्वाधिक वयाच्या यादीत पहिला क्रमांक मिळविला आहे. याची दखल लिम्का बुक ऑफ रेकार्डस्ने घेतली असून विक्रमवीरांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे.
आस्ट्रेलिया येथील किल्डा बीच मेलबॉर्न येथे मागील वर्षी त्यांनी हे धाडस केले. त्या यशस्वी कामगिरीची दखल लिम्का बुक ऑफ रेकार्डस कडे पाठविण्यात आली होती. त्याची सविस्तर पडताळणी करून अखेर त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डस २०१९ या प्रकाशनात घेण्यात आली आहे.






























































