
सामना ऑनलाईन । इंदापूर
इंदापूर येथे कृषी महोत्सवादरम्यान भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उखाणा घेण्याचा मोह आवरला नाही. कृषी महोत्स कार्यक्रमात महिलांसाठी उखाणा स्पर्धेचं आयोजन केले होते. महिलांची लक्षणीय संख्या पाहून स्पर्धेबद्दल विचारणा करत त्यांनी निवेदिकेला उखाणा घ्यायला सांगितले. त्यावर निवेदिकेने लांबलचक उखाणा घेत असल्याचे पाहून पवार साहेबांनी सोप्या आणि सरळ भाषेत उखाणा कसा असावा, याचे प्रत्यक्षिक दाखवत उखाणा घेतला आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
शनिवारी शरद पवारांच्या भाषणामुळे इंदापूरच्या कृषी महोत्सवाची रंगत काही औरच होती. पवारांच्या आग्रहास्तव निवेदिकेने उखाणा घेतला. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित नेत्यांना उखाणा घेताय का अशी विचारणा पवारांनी केली. त्यावर एका कार्यकर्त्याने देखील उखाणा घेतला. मात्र सोप्या व सरळ भाषेत उखाणा कसा असावा असे म्हणत “नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात” असा उखाणा घेतला आणि सभामंडपात एकच हशा पिकवला. यावेळी व्यासपीठावरच असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजत शरद पवार यांच्या उखाण्याला दाद दिली आणि ”आज घरी गेल्यावर बाबांची काही खैर नाही. उखाणा रेकॉर्ड करू नका, नाहीतर आज आमच्या बाबांना घराबाहेर झोपावं लागेल” अशी प्रतिक्रिया दिली.





























































