
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सोमवारी सादर होणार असून मुंबईकरांना पुन्हा एकदा नवे रस्ते, आरोग्य, शिक्षणासह दर्जेदार सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून कोस्टल रोड, सातवा वेतन आयोग, नव्या जलवाहिन्यांसह नागरी सुविधांसाठी भरीव तरतूद केली जाणार आहे.
पालिका आयुक्त अजोय मेहता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करतील. महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सुचनेनंतर गेल्यावर्षी आयुक्तांनी वास्तववादी अर्थसंकल्प मांडल्यामुळे 37 हजार कोटींवर असलेल्या अर्थसंकल्पाची रक्कम गेल्या वर्षी 27 हजार 251 कोटींवर आली आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीदेखील वास्तववादी अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अर्थसंकल्पाचा आकडा जास्त वाढला नाही तरी प्रत्यक्षात येणाऱ्या कामांसाठीच निधीची तरतूद केली जाणार असल्यामुळे अर्थसंकल्प खऱया अर्थाने वास्तवदर्शी ठरणार आहे.
पाच हजार कोटींची वाढ अपेक्षित
पालिकेच्या प्रस्तावित असणाऱया महत्त्वाकांक्षी आणि मोठय़ा प्रकल्पांमुळे अर्थसंकल्प पाच हजार कोटींनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, जल बोगदे, पुलांची दुरुस्ती, नवीन पूल आणि उद्याने-मैदानांसाठी तरतूद केली जाणार असल्यामुळे हा अर्थसंकल्प सुमारे पाच हजार कोटींनी वाढण्याची शक्यता आहे.






























































