
सामना प्रतिनिधी । नगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राळेगणसिद्धीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी तशा प्रकारची तयारी सुद्धा केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पूर्वी ज्यांचे कौतुक केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे मनातून उतरले आहेत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी सांगितले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री राळेगणसिद्धी येथे अण्णांच्या भेटीसाठी दाखल होणार आहेत.
जनलोकपालसाठी आग्रही असलेल्या अण्णांनी पंतप्रधान कार्यालयाला अनेकदा पत्राद्वारे आपल्या मागण्या कळवल्या. दिल्लीत उपोषण देखील केले. मात्र प्रत्येकवेळी आंदोलकांना केवळ आश्वासन मिळाले. त्यानंतर अण्णांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतला. आज उपोषणाचा सातवा दिवस असून गेल्या दोन दिवस मंत्री गिरीश महाजन यांची चर्चा केली, मात्र ती चर्चा निष्फळ ठरली होती. अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्याकडे भेटायला येऊ नका असा पवित्रा घेतला होता. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी दुपारी राळेगणला येणार आहे त्या दृष्टीकोनातून पोलीस प्रशासनाची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह हे देखील अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत.






























































