शेण चोरीला गेले, सरकारी कर्मचाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

चोऱ्या करण्याची सवय लागलेली माणसे काय चोरतील याचा नेम नाही. चोरांनी पैसे कमावण्यासाठी शेणही चोरायला सुरुवात केली असून. जवळपास 1.25 लाख रूपये किंमतीचे शेण चोरीला गेल्याची तक्रार पशूसंवर्धन खात्याने नोंदवली आहे.

कर्नाटकातील चिक्कमंगळुर भागात बिरूर जिल्ह्यामध्ये ही विचित्र तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली आहे. एका व्यक्तीने पशूविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की त्याने 35 ते 40 ट्रॅक्टर शेण यागाती पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गोदामामध्ये लपवल्याचं बघितलं आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं त्यांना कळालं. यानंतर या अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना पशूविकास विभागाच्या पर्यवेक्षकावर संशय आला. त्याची चौकशी केली असता त्याने आपणच शेण चोरल्याचं कबूल केलं. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये ज्याच्या जमिनीवर हे शेण नंतर ओतण्यात आलं त्याचेही नाव घेण्यात आले आहे. हे शेण खतासाठी वापरण्यात येणार होते. बाजारात शेण महाग मिळत असल्याने ते चोरून विकण्याचा पर्यवेक्षकाचा डाव होता.