
पंजाबमधील एका कंपनीने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार सतनाम सिंह संधू यांना समन्स बजावले आहे. सतनाम संधू हे चंदीगड विद्यापीठाचे कुलपतीही आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संधू यांना पहिल्यांदा १२ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते हजर न झाल्याने आता त्यांना २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
याबाबत खासदार संधू यांच्याकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही चौकशी ‘व्ह्यूनाऊ’ (Vuenow) नावाच्या कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा ‘क्लाऊड पार्टिकल घोटाळा’ केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून सर्वसामान्य लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे आरोपींनी लुबाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) आरोपानुसार, संधू यांच्याशी संबंधित काही संस्थांना व्ह्यूनाऊ समूहातील कंपन्यांकडून काही निधी मिळाला होता.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आर्थिक व्यवहारांचे स्वरूप आणि त्यामागचा उद्देश तपासण्यासाठी संधू यांना समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात त्यांची थेट भूमिका नाही.
या प्रकरणात ईडीने तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये व्ह्यूनाऊ समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि संस्थापक सुखविंदर सिंह खारौर तसेच त्यांची पत्नी डिंपल खारौर यांचा समावेश आहे.
ईडी २०२४ पासून या प्रकरणाचा तपास करत आहे. हा तपास आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) या दोन्ही कायद्यांनुसार सुरू आहे.



























































