अनधिकृत गाळे बांधकाम प्रकरण; मुरबाड नगरपंचायतीचा मुख्याधिकारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुरबाड

मुरबाड नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर मुरबाडच्या मुख्य रस्त्यावरील नगरपंचायत कार्यालयासमोरच एकूण 304 टपऱ्या तोडून अनधिकृत आरसीसी गाळे बांधल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला शासनाने निलंबित केले आहे. मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गेल्या चाळीस वर्षांपासून छोटे मोठे व्यापारी विविध प्रकारचा व्यवसाय करीत आहेत. नगरपंचायतीमध्ये प्रथमच निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आले. यातील काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन जुन्या टपऱ्या तोडल्या. या टपरी धारकांकडून लाखो रूपये जमा करून संपूर्ण आरसीसी पध्दतीने गाळे बांधकाम हे अनधिकृतपणे केले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी कोणतीही ठोस कारवाई गाळेधारकांवर केली नाही. याबाबत शिवसेना शहर प्रमुख राम दुधाळे,भाजपचे कार्यकर्ते भास्कर खंडागळे,प्रसाद पोतदार इ.नी कोकण आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन शासनाच्या नगरविकास विभागाने मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या सहीने हे आदेश निघाले असून भुसे यांनी ठाणे जिल्हाधिकारी मुख्यालयात निलंबन काळात रहायचे आहे. दरम्यान ज्या नगरसेवकांच्या आशिर्वादाने हे अनधिकृत गाळे बांधकाम झाले त्यांच्यावरही कारवाई होऊन नगरपंचायत बरखास्त करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.