
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 111 कर्मचाऱयांना आज प्राधिकरणाच्या वतीने कायमस्वरूपी घरे देण्यात आली. यातील 99 घरे ही ठाणे येथील पाचपाखाडी येथे तर 12 घरे मीरा-भाईंदरच्या महाजनवाडी येथे आहेत.
भाडेतत्त्वावर बांधण्यात येणाऱया घरांपैकी 50 टक्के घरे गिरणी कामगारांना देण्यात यावीत आणि उर्वरित 50 टक्के घरांपैकी 3 टक्के घरे या प्राधिकरणाच्या वर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱयांना देण्यात यावीत असा निर्णय गेल्या नोव्हेंबरमध्ये एमएमआरडीएने घेतला होता. एमएमआरडीएमध्ये कायमस्वरूपी पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱयांना त्यात प्राधान्य देण्यात आले. आज सोडत काढून त्यातील 111 कर्मचाऱयांना घरे देण्यात आली.
एमएमआरडीएच्या वतीने मेट्रो रेल्वे, ट्रान्सहार्बर प्रकल्प तसेच विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग आदी प्रकल्प राबवले जात आहेत. या प्रकल्पासाठी कुशल कर्मचाऱयांची नेमणूक करणे आवश्यक ठरत आहे. हे कर्मचारी राज्याच्या विविध भागांतून दाखल होत असल्याने आणि त्यांना मुंबईत घरे सहज उपलब्ध होत नसल्याने प्राधिकरणाच्या वतीनेच घरे देण्याचा निर्णय घेतला गेला.

























































