
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘जुमला राजा’ असून त्यांची राजवट म्हणजे ‘चौपटराज’ आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदींवर ट्विटरवरून तोफ डागली.
उत्तर प्रदेशात पीएच.डी. झालेले बेरोजगार तरुण चतुर्थ श्रेणीच्या नोकऱयांसाठी अर्ज करीत असल्याचे धक्कादायक वृत्त प्रसारमाध्यमांत झळकले आहे. ती बातमी टॅग करतानाच राहुल गांधी यांनी मोदींच्या राजवटीत ना शेतकऱयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळतोय, ना तरुणांना नोकरी-रोजगार मिळतोय’ असे म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱयांची दुर्दशा आणि तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांच्यावरील हल्ला प्रखर केला आहे.
मोदी-पटनायक हिसकावताहेत आदिवासींच्या जमिनी
भवानीपाटणा ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी हिसकावण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केला. ते एका जाहीर सभेत बोलत होते. आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी आणि पटनायक यांची सरकारे केवळ आपल्या उद्योगपती मित्रांचे कल्याण करीत असून दलित – आदिवासींना देशोधडीला लावत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.



























































