
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी एकेकाळी संसदेतले एक प्रभावी वक्ते मानले जातात. विरोधी बाकांवरून सरकारवर टीका करतानाची त्यांची भाषणे गाजली आहेत. पण, गेल्या निवडणुकीत निवडून येऊन आणि सत्ताधारी असूनही संसदेत त्यांचे बोलणे सातत्याने कमी होत गेले. 2014-19च्या संसद कार्यकाळात आडवाणी 296 दिवस हजर होते आणि तेवढ्या काळात त्यांनी फक्त 365 शब्द उच्चारले आहेत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, 2014-2019च्या संसदेत फक्त 296 दिवस उपस्थित राहिले आणि मुख्य म्हणजे ते या पाच वर्षांमध्ये फक्त 365 शब्द बोलले आहेत. यापूर्वीच्या 2009 ते 2014च्या 15व्या लोकसभेच्या तुलनेने 16व्या लोकसभेत आडवाणी यांच्या भाषणातील शब्दांमध्ये 99 टक्के घट आली आहे. यापूर्वी 2009 ते 2014च्या दरम्यान संसदेत आडवाणी तब्बल 35,926 शब्द उच्चारले होते.
2012मध्ये आसाममध्ये होणाऱ्या घुसखोरी आणि जातीय हिंसेवर आडवाणी यांनी जोरदार भाषण केलं होतं. तब्बल 4,957 शब्दांच्या या भाषणात सत्ताधारी पक्षाकडून तब्बल 50वेळा व्यत्यय आणला गेला. मात्र, तरीही त्यांच्या भाषणामुळे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारचे धाबे दणाणले होते. एक उत्कृष्ट राजकारणी राहिलेल्या आडवाणी यांच्यासाठी ती काही नवीन गोष्ट नव्हती. पण, काळ बदलला, 8 जानेवारी 2019 रोजी संसदेत नरेंद्र मोदींच्या सरकारकडून नागरिकता सुधारणा विधेयक मांडलं गेलं. जे मान्य झालं तर आसाममधील राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव पडू शकेल. तरीही इतक्या महत्त्वाच्या विधेयकावेळीही तिथे उपस्थित असलेले आडवाणी एक शब्दही बोलले नाही.





























































