
सामना ऑनलाईन । पणजी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. ती भेट राफेल प्रकरणाशी जोडून तुच्छ राजकारण केले आहे, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला. राहुल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली महाआघाडी मजबूत सरकार देऊ शकेल काय असा सवालही त्यांनी केला. मजबूत सरकार देण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 2019 मध्ये निवडून द्या,असे आवाहन शहा यांनी शनिवारी गोव्यात केले.
पणजी जवळील बांबोळी येथील सागच्या मैदानावर जमलेल्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहा शनिवारी गोव्यात आले होते. शहा यांनी गोव्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये दिल्याचे सांगितले. तसेच गोव्यातील खाण प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. 55 वर्षे राज्य करूनही काँग्रेसने देशाचा काहीही विकास केलेला नाही. मात्र, आमच्या 55 महिन्यांच्या कामाची माहिती ते मागत आहे. त्यांनी 60 वर्षात काय विकास केला ते देशाला सांगावे, त्यानंतर आमच्याकडे हिशोब मागावा असे ते म्हणाले. त्यांना आमच्याकडे हिशोब मागण्याचा अधिकार नसल्याचा दावाही शहा यांनी केला. भाजप सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आजारी असूनही पर्रिकर गोव्याच्या विकासासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करत असतात असे सांगून त्यांच्यासारखा मुख्यमंत्री आपण आयुष्यात पाहिला नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपचा कार्यकर्ता कसा निष्ठेने काम करतो त्याचे पर्रिकर हे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. शहा यांनी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत पर्रिकर आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केल्याचा दावा केला. यावेळच्या अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या सर्वाधिक तरतूदीचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
शहा यांनी दोनापावल येथे जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यानंतर पर्रिकर यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी तुमच्यासोबत येत असल्याचे सांगत शहा यांच्यासोबत पर्रिकर सभास्थळी दाखल झाले.पर्रिकर यांनी बसून भाषण करताना केंद्रात मोदी यांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.


























































