कोकणच्या आंब्याला आखाती देशात नो एण्ट्री, आंबा बागायतदार धास्तावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई/रत्नागिरी

कोकणचा राजा हापूसला युरोपीय देशांनी घातलेल्या बंदीचा अनुभव ताजा असतानाच आता आखाती देशांनीही फवारणी केलेले हापूस न स्वीकारण्याचा निर्णय घेऊन आंब्याला प्रवेश नाकारला आहे. हापूस आंब्यामागील साडेसाती काही संपता संपत नसून आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत यंदा आखाती देशांनी कडक भूमिका घेतली आहेत. मुंबईतील वाशी मार्केटमधून आखाती प्रदेशात आंबा निर्यात करण्यापूर्वी ‘कोडॅक्स’ कंपनीकडून त्याची तपासणी करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच कोकणातून पाठवण्यात आलेला आंबा मुंबई मार्केटमधून दुबईसाठी निर्यात करण्यात आला. त्या फळांच्या निर्यातीपूर्वी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये कीटकनाशकांचा अंश आढळला नाही. परंतु यापुढील तपासणीत अशा प्रकारचा अंश आढळल्यास माल परत पाठवण्यात येणार आहे.

घातक फवारण्या नकोत!
बुरशीसाठी वापरण्यात येणारे कार्बन डेझीम, कीटकनाशक म्हणून वापरले जाणारे क्लोरो पायरीफोस या औषधांकर आखाती देशांनी बंदी आणली आहे. फवारणीनंतर या कीटकनाशकांचा प्रभाव फळांमध्ये राहत असल्याने आणि तो शरीरासाठी अपायकारक असल्याने ही कीटकनाशके फवारलेला आंबा न स्वीकारण्याचा निर्णय या देशांनी घेतला आहे.

30 टक्के हापूस आखाती प्रदेशात, दहा टक्के युरोप- अमेरिकेत, 40 टक्के मुंबईत व उर्वरित 20 टक्के देशातील अन्य बाजारपेठांत विकला जातो. फवारणी करण्यापूर्वी आंबा बागायतदारांनी सावधानता बाळगावी.
– संजय पानसरे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती