‘सारस्वत’-निसर्गाच्या जवळ जाऊया!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. विजया वाड,[email protected]

नाचरा निसर्ग, बालकथासंग्रह.. बालांना कसे घडवायचे हे मोठय़ांना सांगणारा कथासंग्रह….

प्रिय वाचकांनो, परवाच एका बालसाहित्य संमेलनास गेले होते. अध्यक्ष या नात्याने सहज मुलांना म्हटले, ‘जो मुलगा किंवा मुलगी पाच पुस्तकांची नावे सांगेल त्यास मी गुलाबपुष्प देऊन सन्मानित करेन.’ पण एकही मूल पुढे आले नाही. मात्र निवेदन करणाऱया इयत्ता सातवीतील ‘भूमिका’ने झटाझट पाच पुस्तकांची नावे सांगितली. त्यात ‘श्यामची आई’ पहिले! मला अत्यानंद झाला. म्हणून आज पालकांसाठी एक पुस्तक वाचायची शिफारस करतेय. आपल्या जयंत आणि अनंत या दोन मुलांना सुमतीताई नारळीकर रोज रात्री पुस्तके वाचून दाखवीत असत. आपणही आपल्या बालकांसाठी हा उपक्रम जरूर करावा ही हात जोडून विनंती.

‘नाचरा निसर्ग’ या कविता मेहेंदळे यांच्या पुस्तकाची शिफारस करतेय ‘सारस्वत’मध्ये. या पुस्तकातल्या प्रत्येक छोटेखानी कथेत निसर्ग दडलेला आहे आणि लेखिका हळुवारपणे निसर्गाशी असलेलं माणसाचं नातं उलगडून सांगते आहे.

लेखिका म्हणते, ‘धरतीकडून दानशूरता, जलधारांतून ‘ताल’ सागर लहरींतून ‘नर्तन’, वाऱयाकडून ‘कोवळा स्पर्श’ तसेच ‘झपाटलेपण’, खळाळत येणाऱया झऱयाकडून ‘सूर’, पिंपळपानाच्या सळसळीतून ‘लय’ आणि उमलणारं प्रत्येक फूल आपल्याला ‘सुहास्य’ बहाल करतं. बिबटय़ाचा चाणाक्षपणा आणि धडाडी, हरणाची चपळता आणि देखणेपण मनावर ठसतं. फुललेला मोर-पिसारा पाहून सुंदरतेचा अर्थ कळतो.’

‘तो क्षण…’ ही पहिलीच कथा मुलांचे प्रकल्पावरील काम, त्यासाठी लागणारी माहिती ‘गुगल’वर न जाता प्रत्यक्ष निरीक्षणातून गोळा करण्याची धडपड अन् बिबटय़ाचा थरार या घटनांनी विनटलेली आहे. आपल्या मैत्रिणीला संकटसमयी समयचूक मदत करणारी स्वरूपा मनावर ठसते. ऐनवेळेला घाबरून न जाता प्रसंगावधान कसे बाळगावे आणि संकटाशी कसा मुकाबला करावा हे या कथेतून उत्तमरीत्या सांगितले आहे.

‘सागरेश्वर’ ही एक गूढ कथा आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर दापोली जवळच्या ‘सावरी’ वस्तीत राहणाऱया बोरूसची गोष्ट. बोरूसचं कुटुंब छोटंसं! बायको निशी नि मुलगा वरुण. आई-वडील, भाऊ-बहीण अल्याड-पल्याड राहायचे. पण एकमेकांशी दोस्ती घट्ट! बोरूसला सगळे बोरू म्हणायचे. बोरू समुद्रात जाऊन मासे पकडून आणायचा आणि त्याची बायको निशी ते मासे सगळे टोपलीत भरून विकायला न्यायची. बोरू आणेल तेवढे. कधी जास्त, कधी कमी! बोरुला फार वाटे, आपल्या नावेवर मोटर बसवावी नि ती फर्रर्र फर्रर्र करीत समुद्रात न्यावी. पण खर्च वेगवेगळे निघत ना! इलाज नसे बघा. वल्ही मारणं नि मशिनवर बोट चालवणं यात खूप फरक पडतो. मग पैशाची सोय व्हावी म्हणून बोरू दुपारीही बोट सागरात घालू लागला. सूर्यदेव पाण्यात बुडायच्या आत घरी आलं पाहिजे, ही निशीची अट! पण एक दिवस सागराला भरती आली आणि बोरूची नाव जबरदस्त भोवऱयात सापडली. सागराची भीषणता दर क्षणाला वाढू लागली.

अशा कठीण प्रसंगी ईश्वर मनुष्यरूपाने कसा मदतीस धावून आला त्याचे सुंदर वर्णन लेखिकेने या कथेत रंगतदारपणे केले आहे.

‘सत्कर्मांची साथ देते संकटात हात

आणि मनुज करी, करी संकटावरी मात’

असे या कथेचे मर्म आहे. मुलांच्या मनात सत्कर्माविषयी श्रद्धा पेरणे, सन्मार्गाने जीवन जगण्याची प्रेरणा देणे ही या बदलत्या घडीची अत्यंत आवश्यक जीवनमूल्ये आहेत. पब्जीसारख्या ‘वेडय़ा’ खेळात गुंतलेल्या मुलांना असे काही तरी चांगले वाचण्याची संधी या निमित्ताने मिळेल आणि मुले निसर्गकथांत रमतील.

सागरेश्वरच मनुष्यरूपात आला का? बोरूला त्याच्या सत्वशील वृत्तीने वाचवले का? काही प्रश्नांना उत्तरे नसली तरी त्यातले मर्म न सांगता कळते का? नवी प्रेरणा जगण्यास देते का? या साऱयांचे उत्तर म्हणजे ‘सागरेश्वर’ ही कथा होय.

मुलांना गमती सांगत, हसतखेळत, निसर्गाच्या सहवासात अलगद घेऊन जा प्रिय आई-बाबा. काही चांगले ऐकता ऐकता सवय लागली की मुले वाचू लागतील, वाचता वाचता काही हात लिहिते होतील तर आमचे अहोभाग्य! नाहीतर काहीच वर्षात अशी परिस्थिती येईल की लिहिणारे आम्ही नि वाचणारेही आम्हीच! आपण असे होऊ देणार नाही याची मला खात्री आहे म्हणून हे गूज.

नाचरा निसर्ग
लेखिका… कविता मेहेंदळे
मूल्य … 40 रुपये, निहारा प्रकाशन