निरागस मुलगी, मुलगा व पत्नीची निर्घृण हत्या, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

पत्नी आणि निरागस मुलगी व निरागस मुलगा अशा तिघांचा खून करणाऱ्या विकृत व्यक्तीला 5 व्या जिल्हा न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी जन्मठेपेसह 5 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा प्रकार नांदेड-मालेगाव रस्त्यावरील कासारखेडा शिवारात घडला होता.

सत्वशिला गायकवाड ही आपली नवरा जीवन गायकवाडला तु काही काम करत नाहीस आणि मला पसंत नाहीस असे सांगत होती. सत्वशिला जीवनला हिणविण्याचा प्रकार नातलगांसमक्ष सुध्दा करत होती आणि या रागातूनच जीवनने 24 ऑक्टोबर 2016 रोजी सायंकाळी शेताचे काम करून परत येणाऱ्या सत्वशिलाच्या गळ्यात स्कॉर्प बांधून तिचा गळा आवळला आणि खून केला. पत्नी मेल्यानंतर जीवन गायकवाडच्या लक्षात आले की, आता लहान बालकांचा सांभाळ कोण करणार आणि मानसिक ताणाला बळी पडून त्याने दोन वर्षाच्या शैलेशला पाण्याच्या चारीत नेले. पाण्यावर आपटून त्याचे नाक, तोंड दाबले आणि खून केला. तसेच 45 दिवसांच्या मुलीला गळा आवळून खून केला आणि तिला शेतातील गवतात फेकून दिले. अर्धापूरच्या पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील यांनी या घटनेचा तपास केला. त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक दंतूलवार यांनी मदत केली. सखोल तपास करून जीवन गायकवाड विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

न्यायालयात या प्रकरणी दहा साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. या घटनेत कोणताही थेट साक्षीदार उपलब्ध नव्हता. तरीपण सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. यदुपद अर्धापूरकर यांनी पुराव्यांची एक सुंदर साखळी तयार करून परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार हे तीन खून जीवन गायकवाडने केले असल्याचा युक्तीवाद न्यायालयासमक्ष केला. उपलब्ध पुराव्याअनुसार न्या.शिल्पा तोडकर यांनी जीवन गायकवाडला जन्मठेप आणि 5 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली.