
सामना प्रतिनिधी । पेण
देशाच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात पेणच्या नागरिकांमध्ये आक्रोश पसरला असून या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी पेण येथे करण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे 44 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांना पेण येथील महात्मा गांधी मंदिर येथे तालुक्यातील हजारो नागरिकांनी एकत्र जमून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व पक्षीय स्थानिक नेते व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. श्रद्धांजली सोबतच त्या भ्याड हल्ल्याचा निषेध व कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. पेणकरांच्या वतीने पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांना भ्याड हल्लाच्या विरोधात कठोर कारवाई करीता निवेदन ही देण्यात आले.

































































