पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवा! उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सर्व फोटो: संदीप पागडे

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावेळी बोलताना ‘या विषयाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. सगळं जग आपल्यापाठीशी आहे. तेव्हा हिच वेळ आहे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवण्याची’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गुप्तचर विभाकडून माहिती मिळूनही आपण त्याकडे लक्ष देत नसू तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांच्या हातात सूत्र आहेत. ती लोकं करतात काय? त्यांना त्यांच्या जागेचं महत्व कळत नसेल तर त्यांना आता जागेवर उठवा, त्यांना हटवलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सुनावले.

दरवेळी आपण केवळ घोषणा, दंड थोपटून दाखवतो, पण कधी,… पाच वर्ष होऊन गेली. कारण शांत बसणे म्हणजे मर्दानगी नाही, असेही ते म्हणाले.

याआधी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा अभिमान नक्कीच आहे. मात्र आपण तो पाकव्याप्त कश्मीर म्हणजे खरंतर आपल्याच भूभागात केला होता. पण ते लोक आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात संताप आहे. सगळी जनता सरकारच्या पाठिशी आहे. जगभरातून आपल्याला पाठिंबा मिळतो आहे. तेव्हा आता प्रचार, निवडणुका सोडा आधी त्यांना उत्तर द्या, असंही उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.