
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. संतप्त भावना आहेत. दहशतवाद्यांनी हल्ला करून मोठी चूक केली असून त्याची मोठी किंमत दहशतवाद्यांना चुकवावी लागले, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
पंतप्रधान मोदी यांनी आज ‘वंदे भारत एक्सप्रेसला’ हिरवा कंदील दाखविला. तसेच झासी येथील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नाव न घेता पाकिस्तानला इशारा दिला. शेजारचा देश जे कृत्य करत आहे त्याने हिंदुस्थानात अस्थिरता येईल असे त्याला वाटते. पण हे स्वप्न शेजारील देशाने सोडून द्यावे. आर्थिक अडचणीत सापडलेला हा शेजारचा देश आहे. हिंदुस्थानला उद्धवस्त करणे कधीच शक्य नाही. हिंदुस्थानची 130 कोटी जनता या हल्ल्याला सडेतोड उत्तर देईल असे पंतप्रधान म्हणाले.
पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. हा हल्ला करून दहशतवाद्यांनी मोठी चूक केली असून, याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पंतप्रधानांनी हल्ल्यानंतर हिंदुस्थानला पाठिंबा देणाऱया सर्व देशांचे आभार मानले.
वेळ, जागा, कारवाईचे स्वरूप सुरक्षादलांनी ठरवावे
लष्करी जवानांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी वेळ, जागा आणि कारवाईचे स्वरूप कसे असेल हे लष्कराने ठरवावे. सुरक्षादलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे असे पंतप्रधान मोदी यांनी झाशी येथील सभेत सांगितले. पुलवामा हल्ल्यातील दोषींना शिक्षा मिळणारच असे सांगत पंतप्रधानांनी कारवाईचे संकेत दिले.
आज सर्वपक्षीय बैठक
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. संसदेच्या ग्रंथालयात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुलवामा हल्ला, त्यानंतरच्या घडामोडी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा कश्मीर दौरा, संभाव्य कारवाई याबाबत सरकारकडून माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.




























































