
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळेतील विद्यार्थी आणि शहरातील अन्य शाळातील विद्यार्थ्यांनी आज शनिवार पहाटे साडे पाच वाजता जवाहर मैदानावर दीड लाख सूर्य नमस्कार घातले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जागतिक योग दिन व जागतिक सूर्य नमस्कार दिनाच्या औचित्याने एक लाख सूर्य नमस्कार घालण्याचा संकल्प पुर्ण करण्यात आला. हे सलग दुसरे वर्ष आहे. तंदुरूस्त रहाण्याचा संदेश देण्यासाठी दीड लाख सूर्य नमस्कार घालण्याचा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने आयोजित केला होता. गतवर्षी १ लाख ३४ हजार सूर्य नमस्कार विद्यार्थ्यांनी घातले होते.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत कार्यान्वीत असलेली सर्व शाळा, महाविद्यालये तसेच शहरातील अन्य शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. तसेच शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुर्यनमस्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संस्कारांची जोपासना व्हावी, पालक वर्गामध्ये देखील सूर्य नमस्कारांबाबत जागरुकता निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी दिली. त्या म्हणाल्या की, आपले मन, बुद्धी आणि शरीर नीट ठेवल्यास आणि सकारात्मक विचारांची जोपासना केल्यास कोणत्याही स्पर्धेमध्ये अपयश येऊ शकत नाही. सकारात्मक विचारांची जोपासना होण्यासाठी चांगल्या संस्कारांची गरज असते. ते संस्कार घडविण्यासाठीच हा विशेष उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती शिल्पा पटवर्धन यांनी दिली.































































